वाशिम : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू असलेल्या संचारबंदी आदेशामध्ये बदल ( Washim Corona Update ) करुन प्रतिबंधित क्षेत्र वगळता संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी संचारबंदीचे सुधारित आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये सिनेमागृह, हॉटेल, उपहारगृह 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. तसेच, लग्न समारंभास 50 आणि अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना उपस्थित राहण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी 15 मार्च रोजी जारी केले असून सदर आदेश 31 मार्च 2021 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत (Washim Corona Update Night Curfew in Washim district).
या आदेशानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2)(3) अंतर्गत जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असून नागरिकांना हालचाल आणि मुक्त संचार करण्यास सक्त मनाई राहील. या काळात या काळात रुग्णालये, रुग्णवाहिका, रात्रीच्या वेळी सुरु राहणारी औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, दुध आणि दुग्धजन्य विक्री करणाऱ्या डेअरी, रेल्वेने तसेच एस.टी. बस आणि खाजगी बसने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा, हाय-वे वरील पेट्रोल पंप, ढाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरु राहतील. या उद्योगाचे कर्मचारी, कामगार यांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी राहील.
जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना, बाजारपेठा सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत नियमितपणे सुरु राहतील. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरु ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आली आहे, ते सर्व उद्योग सुरु ठेवण्यासाठी परवानगी राहील. जिल्ह्यातील ग्राहकांनी खरेदीसाठी जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्या दुकानातून खरेदी करून शक्यतो दूरचा प्रवास टाळावा. ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु, सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद राहतील. सकाळी 8.30 वाजेपर्यंत मॉर्निंग वॉक आणि व्यायामास सूट राहील. परंतु, मॉर्निंग वॉक व व्यायाम करतांना एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमणार नाहीत, ह्याची काळजी घ्यावी. दुधाचे घरपोच वितरण तसेच रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थाचे घरपोच वितरण सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत अनुज्ञेय राहील.
सर्व प्रकारचे गर्दी होणारे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी राहील. याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास जागा मालकाविरुद्ध दंडनीय कारवाई करण्यात येईल. शिवाय, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मालकाची जागा ही कोरोना राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येईल. जिल्ह्यातील धार्मिक स्थळांमध्ये उपलब्ध जागा आणि सामाजिक अंतराचा विचार करुन एक तासामध्ये किती भक्तांना प्रवेश देता येईल, याचे नियोजन करून भक्तांना प्रवेश द्यावा. दर्शनसाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन करावे. योग्य पद्धतीने मास्क घातल्याशिवाय कोणालाही प्रवेश देवून नये, अंगात ताप असलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येवू नये, यासाठी आवश्यक तपासणी यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे. सॅनिटायझरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. संबंधित व्यवस्थापकांनी प्रत्येक व्यक्तीस मास्क घालून आलेला आहे, याची पाहणी करण्यासाठी व सामाजिक अंतर ठेवल्या जात आहे, याची पाहणी करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग ठेवण्यात यावा.
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, बँक सेवा वगळून इतर शासकीय कार्यालये मंजूर पदाच्या 50 टक्के प्रमाणात सुरु राहतील. शक्यतो घरुनच काम करण्यात (वर्क फ्रॉम होम) यावे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना या एकूण मंजूर पदाच्या 50 टक्के प्रमाणात सुरु राहतील. सदर ठिकाणी आरोग्य तपासणीची व्यवस्था अभ्यांगतांची नोंदवही ठेवून नोंदी घेण्यात याव्या. थर्मल स्क्रीनिंग महीन आणि पल्स ऑक्सिमीटर ठेवण्यात यावे. प्रत्येक व्यक्तीचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी यांची नोंद नोंदवहीत ठेवण्यात यावी, तसेच कोरोणाचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी सर्व सोयी-सुविधा ठेवण्यात याव्यात.
संचारबंदी काळात जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (महाविद्यालय, शाळा) येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांनी ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे इत्यादी कामाकरिता परवानगी राहील. संचारबंदी कालावधीत होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा या त्यांच्या वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. परीक्षार्थींना सदर कालावधीत परीक्षेचे ओळखपत्र (हॉल तिकीट) ओआणि पालकांनी त्यांचे ओळखपत्र जवळ ठेवणे बंधनकारक आहे.
मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी अनुज्ञेय राहतील. ऑटोरिक्षा वाहनात चालक व्यतिरिक्त दोन प्रवासी यांना परवानगी राहील. दुचाकीवर हेल्मेट, मास्कसह दोन प्रवासी यांना मुभा राहील. आंतर जिल्हा बस वाहतूक करतांना बसमधील असलेल्या एकूण प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासीसह सामाजिक अंतर आणि निर्जंतुकीकरण करुन वाहतुकीला परवानगी राहील. याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक याबाबत नियोजन करतील.
सर्व सिनेमागृह, हॉटेल्स, उपहारगृहे 50 टक्के उपस्थितीत सुरु करण्यास परवानगी राहील. याठिकाणी योग्य पद्धतीने मास्क घातल्याशिवाय कोणालाही प्रवेश देवून नये, अंगात ताप असलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येवू नये, यासाठी आवश्यक तपासणी यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे. सॅनिटायझरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. संबंधित व्यवस्थापकांनी प्रत्येक व्यक्तीस मास्क घालून आलेला आहे, याची पाहणी करण्यासाठी व सामाजिक अंतर ठेवल्या जात आहे, याची पाहणी करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग ठेवण्यात यावा. या नियमांचे उल्लंघन करणारी सिनेमागृहे, हॉटेल, उपहार गृहे ही कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असे पर्यंत बंद करण्यात येतील. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना मालकाविरुद्ध 5 हजार रुपये दंड आकारण्यात येईल व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शॉपिंग मॉल मालकांनी व इतर दुकानदार यांनाही हे नियम लागू राहतील (Washim Corona Update Night Curfew in Washim district).
सार्वजनिक ठिकाणी सरकारी, निमसरकारी व खाजगी आस्थापना, कार्यालयात, प्रवासा दरम्यान नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर न केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी व कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
जिल्ह्यात गृह विलगीकरणास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. गृह विलगीकरणाची माहिती स्थानिक संस्थेस तसेच गृह विलगीकरण ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षेत येते, त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे शिफारस करावी. संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी गृह विलगीकरणबाबतचे आदेश निर्गमित करावेत. गृह विलगीकरण मंजूर केलेल्या व्यक्तीच्या घराच्या दर्शनी भागात 14 दिवस कोविड रुग्ण असल्याबाबतचा फलक लावण्यात यावा. कोरोना बाधित रुग्णांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारण्यात यावा. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णास तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात यावे.
लग्न समारंभाकरिता 50 व्यक्तीना परवानगी राहील. त्याकरिता नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रात संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची, तसेच ग्रामीण भागाकरिता तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. लग्न समारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक अथवा मालक, व्यवस्थापक यांना 20 हजार रुपये किंवा प्रति व्यक्ती 500 रुपये यापैकी जी जास्त असेल त्या रक्कमेचा दंड आकारला जाईल. या शिवाय या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मालकाची जागा, मंगल कार्यालये, लॉन कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असे पर्यंत बंद करण्यात येतील. लग्न समारंभ अथवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही. आयोजकांनी लग्नस्थळी किती लोक उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक राहणार आहे. अंत्यविधीकरिता 20 व्यक्तींना उपस्थित राहण्याची मुभा राहील. याबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत सचिव यांची राहील.
Corona Vaccine : लस कशी काम करते, दुसरा डोस कधी घ्यावा, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं https://t.co/7zdyUkUT0l #coronavirus | #CoronaVaccine | #COVID19India
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 18, 2021
Washim Corona Update Night Curfew in Washim district
संबंधित बातम्या :
कोरोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींची पंचसूत्री
Maharashtra Corona Update : 24 तासांमध्ये कोरोनाचा उद्रेक, ताज्या आकड्यांनी चिंता वाढवली