विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, पोहरादेवीच्या महंतांचा रामराम, कारण काय?

| Updated on: Oct 23, 2024 | 9:07 AM

विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम केला आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात यामागचे कारण सांगत नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, पोहरादेवीच्या महंतांचा रामराम, कारण काय?
सुनील महाराज
Follow us on

Mahant Sunil Maharaj Quits Shivsena : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. त्यातच आता इनकमिंग आऊटगोईंगही सुरु झाले आहे. आता विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केला आहे.

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्यामागचे कारण सांगितले आहे. बंजारा समाजाचे धर्मपिठाच्या महंतला जर आठ ते दहा महिन्यापासून भेटीची वेळ मिळत नसेल तर यावरुन माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही, हे सिद्ध होते. त्यामुळे मी जड अंत:करणाने माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा आपल्याकडे या पत्राद्वारे सादर करीत आहे, असे महंत सुनील महाराज यांनी सांगितले आहे.

महंत सुनील महाराजांचे संपूर्ण पत्र

“मा. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसेना पक्ष प्रमुख

सस्नेह जय महाराष्ट्र ! आपण शिवसेना पक्ष प्रमुख आणि राष्ट्रीय स्तरावर आघाडीचे प्रमुख नेते म्हणुन कार्य करत आहेत त्याबद्दल सर्वप्रथम महंत या नात्याने आशीर्वाद सोबतच एक शिवसैनिक म्हणुन हृदयस्पर्शी हार्दिक शुभेच्छा. आपण कोरोना काळातील अतिसंवेदनशील परिस्थितीत केलेली उल्लेखनीय कामगिरीची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. ही बाब सर्व भारतीय आणि खास करुन महाराष्ट्रातील जनतेसाठी गौरवाची आहे. त्याच बरोबर आपण शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेले प्रेम आणि न्याय नात्याने महाराष्ट्र राज्यातील जनतेने आपल्याला कुटूंब प्रमुखाची उपमा दिली आहे. शिवसेना पक्ष बळकट व्हावा म्हणुन मी महंत या नात्याने आपणास आशीवार्द सोबतच पक्षाला माझ्या परिने मदत व्हावी म्हणुन माझी प्रमाणिक जबाबदारी जाणुन मी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणुन पक्ष वाढीसाठी संघटन स्तरावर काम करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या एक वर्षापासुन संघटन स्तरावर काम करण्यासाठी आपल्याकडुन आदेश आणि सुचनाची वाट पाहत आहे.

आपण ९ जुलै २०२३ ला बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे दर्शनाकरीता आले होते व फेब्रुवारी २०२४ ला जनसंवाद यात्रे निमित्त कारंजा व वाशिम येथे आले होते. ती भेट सोडुन आतापर्यंत आपली दहा मिनीटाची भेट घेण्याकरीता सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु आपल्याकडुन दहा मिनीट भेटीसाठी वेळ दिली जात नाहीत. त्याबद्दल थोड शल्य वाटत आहे. कादाचित आपल्या व्यस्त कार्यामुळे आपण वेळ देणे शक्य होत नसेल हे सुध्दा मला मान्य आहेत. मी मागील दहा महिन्यापासुन मातोश्री वर भ्रमणध्वनीद्वारे कार्यालयात आणि मा. श्री रवि म्हात्रे साहेबांना संपर्क करत आहे. भेटीसाठी आपणास सुध्दा काही मॅसेजेस केले होते, तरी सुध्दा दखल घेतली जात नाहीत.

माझ्या कडुन पक्षात काही नविन कार्यकर्त्याला प्रवेशची यादी दिली होती. त्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. या पक्ष प्रवेशासाठी मला निमंत्रण सुध्दा देण्यात आले नाही. साहेब मला पक्षाचे कार्य करायचे आहेत. पक्षाने मला तिकीट दिली पाहिजे हा माझा पुर्ण आणि अंतिम उद्देश किंवा मानस नाहीत. पक्ष प्रमुख या नात्याने आपल्याला काही कटु निर्णय घ्यावे लागतात, हे मी समजु शकतो. परंतु संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज यांचे वंशज व बंजारा समाजाचे धर्मपिठाच्या महंतला जर आठ ते दहा महिन्यापासुन भेटीची वेळ मिळत नसेल तर या वरुन माझी आपल्या पक्षाला काहीच गरज नाही असे सिध्द होते. म्हणुन मी अतिशय जड अंतः करणाने आज माझा शिवसेना पक्षाचा राजीनामा आपल्याकडे या पत्राद्वारे सादर करीत आहे. जय महाराष्ट्र !”, असे सुनील महाराज यांनी म्हटले आहे.