वाशिम : जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर (Panganga river) काही वर्षांपूर्वी बॅरेज उभारण्यात आले. या बॅरेजची फलश्रुती होताना दिसत आहे. बॅरेजमुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. उन्हाळ्याच्या अंतिम कालावधीत पाणी पातळी कमालीची खालावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बॅरेजचे पाणी झपाट्याने खालावत असून काही नदीचे पात्र कोरडेठाक पडत चालले आहे. पैनगंगा नदीवर 11 बॅरेज उभारण्यात आली आहेत. नदीकाठी असलेल्या विदर्भ (Vidarbha) व मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून बॅरेजची उभारणी करण्यात आली. जमिनी संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला. शिवाय पाणी परवाने देण्यात आले. 11 बॅरेजमुळे 7 हजार 690 हेक्टर क्षेत्र सिंचनाखालील आले आहे.
पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजचे पाणी शेतीसाठी घ्यावयाचे असल्यास शेतकऱ्यांना परवाना घ्यावा लागतो. 11 बॅरेजमधील दोन्ही काठच्या जवळपास 9 हजार 294 कास्तकारांना लघु पाटबंधारे विभागाकडून परवाना वाटप करण्यात आला आहे. सिंचनामुळे शेतकरी समृद्ध होत आहेत. मे महिना. त्यात उन्हाचा तडाखा. यामुळं पाणीसाठी कमी झालाय. पैनगंगा नदीवरील बॅरेजही त्याला अपवाद नाहीत. अकरा पैकी चार बॅरेजमध्ये जेमतेम पाणीसाठी आहे. दुसरीकडं सिंचनाचं क्षेत्र वाढल्यानं त्यासाठी पाणी लागते. पिकांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल की, नाही या चिंतेत आता शेतकरी आहे. पुरेशा प्रमाणात पाणी मिळाल्यास योग्य पिकं घेता येतील. पण, पाणी कमी मिळाल्यास अडचण होईल. नदी आहे. पाणी आहे. पण, तो पुरेशा प्रमाणात नसल्यानं चिंता वाढली आहे.
रब्बी व उन्हाळी हंगामात शेतकरी विविध पिके घेत आहेत. त्यामध्ये गहू, हरभरा, उन्हाळी मूग, भुईमूग, हळद, उन्हाळी सोयाबीन आदी पिकांचा समावेश आहे. तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी संख्या वाढत आहे. गत आठवड्यातील अहवालानुसार पैनगंगा नदीवरील 11 पैकी 4 बॅरेजमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. तर 7 बॅरेजमध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.