वाशिम : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अडाण धरणाच्या पायथ्याशी असलेल्या धोकादायक डोहामध्ये (Doh) मुलगी पाय घसरून पडली. त्यामुळं एका 17 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 10 च्या दरम्यान घडली. मृतक मुलीचं नांव ईश्वरी गजानन भागवत (Ishwari Bhagwat) आहे. ती अमरावतीच्या तिवसा (Tivasa) येथील राहणारी होती. ईश्वरी भागवत ही तिची कारंजा येथील एक मैत्रीण व तीन मित्र असे 5 जण आज सकाळी अडाण धरण पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान ईश्वरी भागवत धोकादायक डोहात पाय घसरून पडली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या मैत्रिणीला वाचविण्यात यश आले. मात्र ईश्वरीचा मृत्यू झाला. घटनेनंतर ईश्वरीचा मृतदेह काढून कारंजा उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहेत.
ईश्वरी व तिची एक मैत्रीण तसेच तीन मित्रांनी एक प्लान केला. ईश्वरी व तिची मैत्रीण व मित्र अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील राहणारे. त्यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील अडाण धरण पाहण्याचे ठरविले. त्यासाठी ते सकाळीच धरणावर गेले. धरणातील पाण्याची स्पर्श करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. पाण्याशी खेळत असताना ईश्वरीचा तोल गेला. ती धरणात घसरून पडली. त्यानंतर तिला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, त्यात कुणीही यशस्वी होऊ शकले नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं सर्व घोळ झाला.
अडाण धरणात पाणी आहे. या पाण्याला स्पर्श करण्याचा मोह या मुलांना आवरता आला नाही. डोहात तिचा पाय घसरला. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तिची मैत्रीणही पाण्यात पडली. तिच्या मैत्रिणीला पाण्याबाहेर काढता आले. पण, ईश्वरी खोल पाण्यात गेली. मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर काही जण तिला वाचविण्यासाठी पाण्यात शिरले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. ईश्वरीच्या शरीरात पाणी गेलं होतं. तिला बाहेर काढून तिच्या पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तोपर्यंत ईश्वरीचा जीव गेला होता.