आजी-आजोबांनी लागवड केलेले व नैसर्गिक उगवलेली शेतातील गावरान आंबे मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहेत. आमराया नष्ट झाल्याने गावरान आमरसाची रसाळी काही होत नाही. ग्रामीण भागात सुद्धा गावरान आंब्यांकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. मात्र, वाशीम जिल्हयातील आमखेडा या गावात अविनाश जोगदंड यांच्या शेतातील शेकडो वर्षे जुण्या आमराई आजही गावाचे गोडपण जपत आहेत. तीन पिढ्यांनी गावरान आंब्यांचा हा गोडवा जपला आहे.
१०० वर्षांपूर्वीचा वारसा
सुमारे १११ वर्षांपुर्वी भिवाजी जोगदंड यांनी लावलेले हे आंबा वृक्ष बाबारावजी जोगदंड यांनी संवर्धित केले. तो वारसा त्यांच्या चौथ्या पिढीनेआजही जतन केला आहे. कुटुंबातील सदस्याप्रमाणे जोगदंड कुटुंब या गावरान आंबा वृक्षाची काळजी घेतात. आमखेडा गावातील या आमराईंना आंब्यांचा बहर आला आहे. उन्हाळयात याच आंब्यांचा उपयोग रसाळीसाठी करून गावचे गोडपण जपले जात आहे.
.
तीन पिढ्या आजही एकत्र
आमखेडा येथील जोगदंड कुटुंबात तीन पिढ्यातील तब्बल २७ सदस्य आजही एकत्र राहतात. त्यांच्या शेतातील आमराईत घोश्या, गोटया,शेप्या,खोबऱ्या,भोपळी, साखऱ्या,शेंद्र्या, केळ्या आदी गावराण आंबे आहेत. कार्बाईड या रसायनाने पिकवलेल्या आंब्यापेक्षा ग्रामीण भागात आजही या गावराण आंब्यांना प्रचंड मागणी असते. या आंब्यांची तुरट-आंबट गोड चवीने तोंडाला एक खास स्वाद येतो.
गावगाड्यातील परंपरा जपली
पूर्वी खेड्यात एकमेकांच्या घरी आंबे देण्याची पद्धत होती. आमराई लुप्त झाल्यामुळे खेड्यात अलीकडे आंबे देण्याची परंपरा राहिलेली दिसत नाही. मात्र कुठलाही व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता जोगदंड कुटुंबियांबरोबरच गावगाडयातील लोकांना उन्हाळयात याच गावराण आंब्यापासुन रसाळी चाखता येते हे विशेष.
आढ्यांचा घमघमाट
घरात प्रवेश करण्यापूर्वीच पिकविण्यासाठी टाकलेल्या गावरान आंब्याच्या आढ्यांचा सुगंध जिभेस पाणी आणत असे. पाहुणे आल्यावर त्यांच्यासमोर बादलीभर पाणी व टोपलेभर आंबे ठेवले जात. आमरस अन् पोळी हा विशेष पाहुण्यांचा पाहुणचाराचा खास मेनू असायचा. त्यामुळे आपल्या पुर्वजांनी विकसीत केलेल्या आमराई संवर्धित करण्यासाठी आमखेडा येथील जोगदंड परिवाराचा आदर्श घेण्याजोगा आहे.