वाशिम : ईद निमित्त बंदोबस्तासाठी जात असलेल्या पोलिस व्हॅन (Police Van)चा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना अमरावती महामार्गावर घडली. या घटनेत 8 पोलिस कर्मचारी जखमी (Injured) झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त झालेले वाहन नुकतेच पोलिस दलात दाखल झाले होते. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अपघातस्थळाची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. (In Washim, a police van overturned due to a flat tire, injuring eight police)
उद्या देशभरात ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. याचसाठी वाशिमवरुन कारंजा येथे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी चालले होते. पोलिस गाडी अमरावती महामार्गावरील बिटोडा फाट्याजवळ येताच गाडीचा टायर फुटला. यामुळे गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आठ कर्मचारी जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. (In Washim, a police van overturned due to a flat tire, injuring eight police)