विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, प्रतिनिधी, वाशिम : सहा नोव्हेंबरला बुलढाण्यात सोयाबीन (Soybean) कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेत बोलताना केलं. रविकांत तुपकर म्हणाले, लेकरू रडल्याशिवाय माय त्याला दूध पाजत नाही. तुम्ही आम्ही बोलल्याशिवाय तुमचं कोणी सुद्धा ऐकणार नाही. सरकार हे गेंड्याच्या कातडीचं आहे. हे फक्त आमदारांचे लाड करतात. यांना बाकीचं काही घेणं देणं नाही.
सध्या महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर आहे. मनोरंजन म्हणून फक्त टीव्हीवर या बातम्या सुरू आहेत. लोक याला कंटाळले आहेत. बेरोजगार तडपतोय. शेतकरी मरतोय, कामगार मरतोय. महिला सुरक्षित नाहीत. सरकार फक्त दिल्लीला जाणे आणि येणे एवढंच काम करतंय. एकनाथ शिंदे काय म्हणाले, उद्धव ठाकरेंनी काय टीका केली, देवेंद्र फडणीस काय बोलले एवढंच सध्या चालू आहे, अशी टीका रविकांत तुपकर यांनी माध्यमांवर केली.
विदर्भातील नेत्यांची गाडी खारघर, पनवेलच्या पुढे गेली की शेतकरी त्यांच्या डोक्यात राहत नाही. विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तर कोणी वालेच राहिला नाही. विदर्भ, मराठवाड्यातील नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत हे दुर्दैव आहे.
विदर्भातील नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचा आदर्श घ्यावा, उसाच्या प्रश्नावर ते सर्व एकत्र येतात. मात्र विदर्भातील नेत्यांचे दहा दिशेला दहा तोंड असतात. शेतकऱ्यांच्या पोरांनी आमदार, खासदार यांना गावात आल्यावर पायातले पायतानं काढून प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही आमच्या प्रश्नावर तिथे जाऊन काय करता, याचा जाब विचारला पाहिजे, असंही रविकांत तुपकर म्हणाले.
आम्ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही. आम्ही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. मी आव्हान करतो की शेतकऱ्यानं आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. आपण संघर्ष करू. वेळ पडली तर या नेत्यांच्या कॉलर पकडून चौकात फटके मारू. त्यांच्या छाताड्यावर बसू.
पण आत्महत्या करू नका. ज्यांनी ज्यांनी आपल्यावर आत्महत्येची वेळ आणली त्यांच्या कॉलर पकडण्यासाठी समोर या असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो, असंही रविकांत तुपकर यांनी सांगितलं.