पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर चांगलाच प्रहार केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा राज्य दौरा महत्त्वाचा ठरला आहे. आज अनेक योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. तर आता मुंबई मेट्रो-3 चे उद्धघाटन आणि इतर योजनांचा उद्धघाटन पंतप्रधान थोड्याच वेळात करतील. सकाळी त्यांनी विदर्भातील वाशिम जिल्ह्याचा दौरा केला. भारत जोडो यात्रेला ज्या भागात प्रतिसाद मिळाला, त्याच भागात आज मोदी यांनी दौरा केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह काँग्रेसवर हल्लाबोल केला. वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे त्यांनी महायुती सरकारच्या कामावर स्तुति सुमनं उधळली.
महाविकास आघाडीचे दोनच अजेंडे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक दशकांपर्यंत अनेक संकटांचा सामना केला आहे. महाआघाडीतील सरकारचे दोनच अजेंडे होते. शेतकऱ्यांशी संबंधित योजना ठप्प करायच्या. दुसरा त्या योजनेत भ्रष्टाचार करणे, अशी घणाघाती टीका मोदी यांनी केली. आम्ही पाठवलेला पैसा तुमच्याकडे येत नव्हता. शेतकऱ्यांच्या खात्यातील पैशात त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे असा आरोप त्यांनी केला. तो आता करता येत नसल्याचे मोदी म्हणाले. दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. त्याचा मुख्य आरोपी काँग्रेसचा नेता निघाला. काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे. त्या पैशापासून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. आपल्याला सावध राहायचं आहे. इतरांना सावध करायचं आहे. सोबत मिळून लढायचं आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसचा तर यात हातखंड
प्रत्येक निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन देणं हा काँग्रेसचा हातखंडा आहे, असा चिमटा मोदी यांनी काढला. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाआघाडी सरकारने सिंचनाशी संबंधित अनेक कामे रोखून धरले होते. पण आमचं सरकार आलं आणि हे काम सुरू केलं. आपण सर्व मिळून विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
आमच्या सरकारने अनेक प्रकल्प दिले आहेत. राज्यात शेतकऱ्यांना एनडीए सरकारने डबल फायदा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांचं वीज बिल शून्य केलं आहे. बिलावर शून्य लिहिलंय ना, असा सवाल करत त्यांनी विकासाचा गाडा पुढं नेण्याचं आश्वासन यावेळी दिलं.