वाशिमच्या पोहरादेवीमध्ये आज विकासकामांचं उद्घाटन झालं. बंजारा समाजाच्या इतिहासाचं, परंपरेचं प्रतिक असणाऱ्या ‘बंजारा विरासत’ चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी उपस्थित बंजारा समाज बांधवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. आज नवरात्रीत मला माता जगदंबेच्या मंदिरात त्यांचा आशीर्वाद घेण्याचं सौभाग्य मिळालं. मी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीवर जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. मी या दोन्ही संतांसमोर नतमस्तक होत आहे. आज गोंडवाना राणी दुर्गावतीची जन्म जयंती आहे. गेल्यावर्षी त्यांची 500 वी जयंती साजरी केली होती. मी दुर्गावतीला नमन करतो, असं म्हणत मोदींनी भाषणाची सुरुवात केली आहे.
बंजारा विरासतचं आज लोकार्पण केलं. हे म्युझियम देशातील नव्या पिढीला परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवेल. मी सर्वांना आग्रह करतो की आज जाण्यापूर्वी बंजारा विरासत संग्रहालय पाहूनच जा. मी देवेंद्र फडणवीस यांना अभिनंदन करतो. त्यांनी पहिल्या सरकारमध्ये संकल्पना केली. आज उत्तम पद्धतीने हे संग्रहालय बनलं आहे. तुम्ही हे संग्रहालय पाहा. मी आग्रह करतो. नंतर कुटुंबालाही वेळ काढून संग्रहालय पाहायला पाठवा, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
आपल्या बंजारा समाजाने अनेक संत दिले. त्या संतांनी अध्यात्मिक यात्रेला चैतन्य दिलं. इंग्रजांनी या समुदायाला गुन्हेगार घोषित केलं होतं. पण स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाची काळजी करणं, त्यांना सन्मान देणं गरजेचं होतं. पण काँग्रेसने त्यांना आपल्या बरोबरीचं मानलं नाही. त्यांना वाटतं फक्त आमचीच सत्ता राहावी. त्यामुळे त्यांनी बंजारा समाजाला दूर ठेवलं. बंजारा समाजाला सन्मान देणं हे नंतरच्या सरकारची जबाबदारी होती, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसला दलितांना दलित ठेवायचं आहे. गरीबांना गरीब करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसपासून सावध राहा. अर्बन नक्षल काँग्रेसला चालवत आहे. काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहे. त्यामुळे ते आपल्यात फूट पाडू पाहत आहे. त्यामुळे एक व्हा. ही वेळ एकत्र राहण्याची आहे. दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. त्याचा मुख्य आरोपी काँग्रेसचा नेता निघाला. काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे. त्या पैशापासून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. आपल्याला सावध राहायचं आहे. इतरांना सावध करायचं आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.