वाशिम : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने दरातील चढ उताराचा सामना करावा लागत आहे. मागील आठवड्यात दरात थोडी तेजी आलेली असताना काल पुन्हा आठवड्याच्या सुरवातीलाच दर स्थिरावले आहेत. वाशिमच्या बाजारात सोयाबीनला किमान ४७२५ ते कमाल ५२२५ रुपये दर मिळाला आहे. तर आवक घटली असून ३००० क्विंटल आवक झाली आहे. सोयाबीनला हवा तसा दर मिळत नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक निराश आहेत. त्यामुळे आता सोयाबीनचा पेरा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोयाबीनच्या बाबतीत शेतकऱ्यांनी संयमाचे धोरण ठेवले. विक्रीची घाई न करता टप्प्या-टप्प्याने बाजारात आणले आहे. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन साठवलेले आहे. सोयाबीन विक्रीस आणलेले शेतकरी सदाशिव उमाळे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले, ‘सोयाबीनच्या बाबतीत यंदाचे वर्ष मोठे निराशेचे गेले आहे.
मी ३५ क्विंटल सोयाबीन आतापर्यंत साठवून ठेवले होते. मात्र आता दरवाढ होण्याची शक्यता दिसत नाही. शिवाय शेती कामासाठी पैसे लागणार आहेत. त्यामुळे २० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. ५२२० चा दर मिळाला दर कमी असला तरी नाईलाज आहे.
दरवाढी संदर्भात व्यापारी आणि अडते सुरेश भोयर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, यंदा उत्पादनात मोठी घट झाली. असे असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा दरवाढीचा फायदा व्हायला हवा होता. मात्र आयात निर्यात धोरणामुळे तसे झाले नाही. आता फार मोठ्या दरवाढीचा शक्यता कमी आहे. पुढील महिन्यात बियाण्यासाठी खरेदी होण्याच्या दृष्टीने थोडी दरवाढ होऊ शकते.
यावर्षी सोयाबीनने मोठी निराशा केल्यामुळे राज्यातील पेरा घटण्याची शक्यता आहे. शिवाय सोयाबीनच्या उत्पादनात सातत्याने मोठी घट होत आहे. अवकाळी पावसाचा फटका आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळेही शेतकरी सोयाबीनला पर्याय शोधण्याचा विचार करत आहेत. असे झाल्यास सोयाबीनच्या देशातील उत्पादनही घटू शकते.