वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार, निधन, राजीनामा किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील (Gram Panchayat) काही पदे रिक्त झाली आहेत. या रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर (program announced) केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील वाशिम (Washim) तालुक्यातील 7 ग्रामपंचायती, मालेगाव तालुक्यातील 8 ग्रामपंचायती, मंगरुळपीर तालुक्यात 7 ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. रिसोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायती व मानोरा तालुक्यातील 29 अशा एकूण 94 ग्रामपंचायतीमधील 137 रिक्तपदाच्या पोट निवडणुका घेण्यात येणार आहे.
निवडणूक असलेल्या क्षेत्रामध्ये निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत 9 जून 2022 पर्यंत अस्तित्वात राहील. मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना या कालावधीत करता येणार नाही. असे ग्रामपंचायत निवडणुकीचे नोडल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.
पोटनिवडणूक जाहीर होताच उमेदवार तयारीला लागले आहेत. रिक्त झालेल्या जागेवर काही दिवसांसाठी का होईना, आपण गावचे कारभारी होऊ शकतो, याचा आस उभेच्छुकांना लागली आहे. त्यामुळं ते आता पोटनिवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदवारांना मतदारांशी संपर्क वाढवावा लागणार आहे.