भाजपचे वरिष्ठ नेते आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे आज वाशिममध्ये आहेत. सुधीर मुनगंटीवार हे आज वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी पोहरादेवी इथं जगदंबादेवी आणि संत सेवालाल महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आले होते. पोहरादेवी येथील जगदंबा देवी दर्शन घेऊन मी पुढील प्रचाराला सुरुवात करत आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी पोहरादेवी इथं माध्यमांशी बोलत होते. पोहरादेवी इथं माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीका केली आहे. तसंच मित्रपक्षातील नेत्यांनाही टोला लगावला आहे.
राज्यात सर्वच मतदारसंघ भाजपला सोडणार तर मग मित्रांना काय देणार ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असा भाव असला पाहिजे. मोठं मन ठेवावं लागतं. एकनाथ शिंदेंनी क्रांती केली नसती तर आपण मंत्री झालो असतो का? एकनाथ शिंदे यांनी जीवाची बाजी लावून उठाव केला, असं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.
काँग्रेसच्या चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी निवडणूक असल्याचं म्हणत भाजपवर टीका केली होती. त्यांच्या या व्यक्तव्याला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी धानोरकर दाम्पत्यावर जहरी टीका केली आहे. हे काँग्रेसवाले लोक हे काय लोकशाही सांगणार यांनीच अन्याय केला. 19 महिने सामान्य लोकांना जेलमध्ये टाकून सख्या भावाबहिणींना नस बंदीसाठी कपडे काढून खाटेवर टाकलं. हजारो मुस्लिम बांधवांचे घरे तोडले. 5 वर्षाचा मुलासमोर त्याच्या पित्याला जळत्या ट्रकमध्ये टाकले. त्यांनी लोकशाहीच्या गोष्टी करणे म्हणजे मला आश्चर्य वाटतं, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पोहरादेवी इथल्या भक्तीधाम इथं बंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य हलगीवर बंजारा समाजाचे महंत जितेंद्र महाराज आणि सुधीर मुनगंटीवार यांनी ठेका धरला. स्थानिकांशी सुधीर मुनगंटीवार यांनी संवाद साधला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी महायुतीतील नेत्यांनाच त्यांनी कोपरखळी मारली. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंजगाच्या प्रश्नांवर सर्वच मतदार संघ भाजपला सोडणार तर मित्रांना काय देणार, असा सवाल मुनगंटीवार यांनी लगावला आहे.