सांगलीः कृष्णा नदीची पाणी (Krishna River) पातळी खालावल्याने सांगलीकरांची अवस्था म्हणजे नदी उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे. यामुळे सांगली शहरावर पाण्याचे संकट (Water crisis in Sangli city) निर्माण झाले आहे. नदीची पाणी पातळी खालवल्याने अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा (Insufficient water supply) होत आहे. पाणी टंचाई निर्माण झालीच तर आपण कोयनेतून पाणी मागवू असे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी सांगितले आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी अचानक खालावली आहे. त्यामुळे सांगली शहरासह उपनगरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
औद्योगिक व नागरी क्षेत्रात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केला आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे सुरळीत नियोजन सुरू असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मे महिन्यात सांगली महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा सुरळीत होता. आगामी महापुरचा धोका लक्षात घेता पाटबंधारे विभागाकडून नदीवर असणाऱ्या बंधाऱ्याचे बॅरेक काढण्यात आले आहेत. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यातच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे.
पाणी पातळी खालावल्याने सांगलीकरांना आता पाणी टंचाईला सामोरे लावे लागणार आहे. कृष्णा नदीपात्रातून सांगली शहराला पुरवठा होणाऱ्या पाण्याचा उपसा केला जातो. तसेच औद्योगिक क्षेत्रासाठीही तीन स्ट्रेनरच्या सहाय्याने पाणी उपसले जाते. औद्योगिकच्या तीन पैकी दोन स्ट्रेनर पाणी पातळी कमी झाल्याने उघडे पडले आहेत तर सांगली शहरासाठी पाणी उपसा करणारे 200 अश्र्वशक्तीचे दोन पंपही उघडे पडले आहेत. त्यामुळे पुरेसा पाणी उपसा होत नाही.
परिणामी सांगली शहर, उपनगरासह औद्योगिक क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाने वर्तविली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहनही पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
सद्य स्थितीत सांगली शहरातील आयर्विन पुलाजवळ कृष्णेच्या पात्रात 300 क्यूसेक पाण्याचा प्रवाह असून पाणी पातळी ही तीन फूट आहे. सध्या नदीच्या पात्रात पाणी जरी कमी असली तरी शासन निर्णयानुसार पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे बॅरेक काढाव्या लागतात. त्यामुळे आपल्याला पाण्याची पातळी कमी दिसत आहे. जर गरज लागलीच तर आपण कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करू शकतो. सध्या दुष्काळी भागात पाणी पोहोचवणाऱ्या म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू या तीनही योजना सुरू आहेत. जर पाणी टंचाई निर्माण झालीच तर आपण कोयनेतून पाणी मागवू शकतो त्यामुळे नागरिकांना काळजी करण्याचे कारण नाही अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी व्यक्त केले आहे.