नवी मुंबईः पनवेलमधील खारघर, तळोजा, कळंबोली भागात गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाई भासू लागली आहे. या भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. मात्र योग्य व्यवस्थापन करून पाणी सोडले जात नसल्याने पाणी सोसायटीपर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्यात. याबाबत सिडको दरबारी अनेक वेळा खेटा घालूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर रहिवाशांनी आज मोर्चा काढला.
सीबीडी येथील सिडको कार्यालयावर मोर्चा काढत यावेळी सिडको विरोधात घोषणाबाजी करणारे पोस्टर रहिवाशांनी फडकाविले. कृत्रिमरीत्या पाणीटंचाई निर्माण करून सिडको टॅंकर माफियांचे भले करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. सरकारच्या नियमानुसार सिडको प्रत्येक फ्लॅटला दररोज 675 लीटर पाणीपुरवठा करण्यास जबाबदार आहे. तरीही मुबलक पाणी सिडको देण्यास अयशस्वी ठरत असल्याचे मंगेश रनावडे यांनी सांगितले. यासंदर्भात पाणी पुरवठ्याचे ऑडिट करण्यासाठी सिडको लवकरच एक एजन्सी नियुक्त करेल.
खारघर, कामोठे तळोजा परिसरात शेकडो गृहप्रकल्प उभारले जात आहेत. यामध्ये सिडकोच्या गृहप्रकल्पांचाही समावेश आहे. हे प्रकल्प सुरू झाल्यावर याठिकाणी लोकसंख्या वाढणार असल्याने वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने सिडकोचे पाणीपुरवठ्याबाबत काय नियोजन आहे? असा प्रश्न खारघरच्या रहिवाशी यांनी उपस्थित केला.
पाण्याचे प्रश्न सोडले नाही तर लवकरच सिडको एमडीविरोधात सिग्नेचर कॅम्पेन सुरू होणार आहे, यामध्ये सिडको एमडीची हकालपट्टी करा, हा एकच उद्देश राहणार असल्याचं रहिवाशी यांनी सांगितले. आतापर्यंत 2 ते 3 कोटी रुपये पाण्याच्या टँकरसाठी आम्ही खर्च केले. आम्हाला ज्यावेळी इथे घर दिले जाते, त्यावेळी मूलभूत सुविधांचा उल्लेख होतो. मात्र कित्येक वर्षांपासून आम्ही यापासून वंचित आहोत, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असे यावेळी रहिवाशांनी सांगितले.
संबंधित बातम्या
भाजप नगरसेवकाला काळं फासणाऱ्या शिवसैनिकांना अटक आणि जामीनावर सुटका, न्यायालयाबाहेरच सत्कार!
नवी मुंबई महापालिकेची स्वच्छता मोहीम, कचराकुंड्या हटवून वृक्ष सुशोभिकरण
Water scarcity in Kharghar, Taloja, Kalamboli; People’s agitation against CIDCO