मुंबई : आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. माझ्या मनात कुठेही जाण्याचा विचार नाही. तसे काही असेल तर मी स्वतः येऊन सांगेन. पण बाहेर जी काही कुजबुज चालू आहे, आमच्याबाबदल काही बातम्या पसरवण्याचे काम काही विघ्नसंतोषी करत आहेत. आमच्या पक्षात तसे कोणी नाही. परंतु, काही पक्षाबाहेरचे आहेत. काही पक्षाचे प्रवक्ते तर राष्ट्र्वाईचे प्रवक्ते झाल्यासारखे वागत बोलत आहेत. त्यांना आमच्या पक्षाबद्दल बोलायचा कुणी अधिकार दिला अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत याना फटकारले आहे.
काही जणांनी माझ्या ट्विटचा उल्लेख केला. माझ्या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री पद गेल्यावर ते काढले बाकीचे तसेच आहे. आता सारखा त्यावर झेंडा लावूनच ठेवू का? असा सवाल करून ते पुढे म्हणाले, कोणत्याही बाबतीत ‘ध’ चा ‘मा’ करू नका. आमच्या पक्षाबाबदल जे काही सांगायचे असतील ते आमचे प्रवक्ते सांगतील. आमचे नेते सांगतील. आमची भूमिका मांडण्यासाठी आमचे प्रवक्ते, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील नेते मजबूत आहेत असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत हा मुद्दा मी मांडणार आहे. आमचे प्रवक्ते काय सांगायचे ते सांगतील. तुम्ही ज्या पक्षाचे आहात त्याबद्दल तुम्ही सांगा. तुमच्या पक्षाचे जे मुखपत्र आहे त्यातून सांगा, त्याबद्दल सांगा. पण तुम्ही आम्हाला कोट करून अलाने आले, फलाने झाले असे काही करू नका. आमची भूमिका मांडायला आम्ही सक्षम आहोत अशा शब्दता त्यांनी संजय राऊत यांना सुनावले.
आमचे वकीलपत्र दुसऱ्या कुणी घेण्याची गरज नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. कारण नसताना काही बातम्या आल्या. आमचे मित्र पक्ष आहेत. उद्धव ठाकरे याना काही जणांनी विचारले तेव्हा ते म्हणाले मी एकटा लढेन. अशा बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. काही जण पृथ्वीराज बाबाना विचारतात. शिंदे गटाला विचारतात.
तिकडे शिंदे गटाचे म्हणतात, आम्ही त्यांना घेणार नाही. आम्ही घेऊ येऊ देणार नाही. अरे बाबा पण चाललंय कोण ? कोणत्याही गोष्टीचा आता तुकडा पाडू नका. राष्ट्रवादी पक्ष हा आम्ही परिवार म्हणून काम करत आहोत. आमचे जे काम चालले आहे ते सुरळीत सुरु आहे. आम्ही एकत्र आहोत आणि राहणार असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.