‘वेळ पडल्यास महायुतीमधून बाहेर पडू, पण उमेदवार मागे घेणार नाही’ असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आपण अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार देण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमरावतीचा खासदार सर्वांना सोबत घेऊन जाणारा पाहिजे, खासदार कोणत्याही गोष्टीचं क्रेडिड घेणारा नसावा, असं म्हणत बच्चू कडू नवनीत राणा यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला बच्चू यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांचा विरोध कायम असून आज दुपारी ते महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. बच्चू कडू अमरावतीमध्ये नवनीत राणांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. त्यांची भूमिका जाणून घेतली.
काय म्हणाले बच्चू कडू ?
बच्चू कडू यांचा नवनीत राणांना विरोध अद्यापही कायम आहे. महायुतीच्या पोस्टरवर तुमचा फोटो नाही, याबद्दल बच्चू कडू यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘ तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा काही फोटोचा आग्रह बिग्रह नाही. आमचा फोटो असो किंवा नसो, आम्ही लोकाच्या मनात आहोत, लोकांच्या मनात घरं करू आणि काम करू’ असं बच्चू कडू म्हणाले.
वेळ आली तर महायुतीतून बाहेर पडू पण..
एकनाथ शिंदे यांचा मी अतिशय आदर करतो, मी त्यांचा मानही ठेवतो. पण आताची निवडणूक ही प्रहार पक्षाच्या दृष्टीने अस्तित्वाची लढाई आहे. शिंदे साहेब आणि आमची दोस्ती आहे, आमची मैत्री तुटू नये अशीच आमचीही इच्छा आहे. या अमरावती जिल्ह्यापुरती तरी त्यांनी आम्हाल सवड द्यावी, दुर्लक्ष करावं, असं ते म्हणाले.
पण जर तुम्हाला अडचण होत असेल, आमच्या मुळे जर एकनाथ शिंदे यांना त्रास होत असेल, तर त्यांनी स्पष्ट सांगावं. आम्ही उमेदवारी तर मागे घेणार नाही, पण तशीच वेळ आली तर आम्ही युतीतून बाहेर पडू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. एकंदरच बच्चू कडू हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असून नवनीत राणा यांच्याविरोधात ते आक्रमक झालेले दिसत आहेत.
बच्चू कडू यांचा कडाडून विरोध
नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी मान्य नाही. त्यांचा प्रचार मी करणार नाही. तर त्यांचा पराभव करणार, असं बच्चू कडू काल म्हणाले होते. उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं होत नाही. आता तर उमेदवारी जाहीर झालीय. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आपण सगळं व्यवस्थित करू. एकतर दुसरं कुणाला उमेदवारी देऊन त्याला निवडून आणून नवनीत राणा यांना पाडता येतं का? किंवा दुसऱ्या एखाद्या सक्षम उमेदवाराला समर्थन देऊन नवनीत राणा यांना पाडता येतं का? या गोष्टींचं नियोजन सुरु आहे, असं बच्चू कडू म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर ते नवनीत राणा यांच्याविरोधात दिनेश बूब यांना उभं करणार का ? आजच्या पत्रकार परिषदेत ते काय भूमिका मांडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.