Video | Maharashtra weather forecast : हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा, राज्यभरात पाऊस बरसला, संततधार कायम राहणार

| Updated on: Feb 18, 2021 | 7:36 PM

Maharashtra weather forecast: 19 फेब्रुवारीला मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे. (Weather Alert Unseasonal Rain in Maharashtra)

Video | Maharashtra weather forecast : हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा, राज्यभरात पाऊस बरसला, संततधार कायम राहणार
Maharashtra Rain (फोटो प्रातनिधिक)
Follow us on

पुणे: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात तळकोकण ते विदर्भात भंडारा जिल्ह्यापर्यंत अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, रायगड, भंडारा, यवतमाळ, बीड, वाशिम, सोलापूर, औरंगाबाद, गोंदिया, परभणी, अमरावती, बुलडाणा, पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गुरुवार आणि शुक्रवारी मध्यम व मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (weather alert of February 18 Central Maharashtra and Marathwada or kokan have been came true of heavy rains by Pune Meteorological department)

विदर्भातसह मध्य महाराष्ट्रात मध्यम व मुसळधार पावसाचा इशारा

नागपूर गोंदिया बऱ्यापैकी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर, चंद्रपूर, नांदेड, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भाला आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रवात प्रभाव अद्याप कायम असल्यामुळे पुढे काही दिवस पाऊस होणार आहे. या पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. 19 फेब्रुवारीला मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

राज्यात ठिकठिकाणी पावासाची हजेरी

बुलडाणा

बुलढाणा जिल्ह्यात बुधवार (17 फेब्रुवारी) रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय. तर गुरुवारी दुपारी सुद्धा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस झालाय.अवकाळी पाऊसाने रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा, पिकांसह फळबागांच देखील मोठ नुकसान झालेय. मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील शेतकरी सुभाष नवले यांच्या शेतातील गहू, हरबरा, कांदा पीक माती मोल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. अगोदरच कर्ज आणि आता बळीराजाने झोडपले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं शासनाच्या निर्णयाकडं लक्ष लागलेय.


Weather Update : राज्यात पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऐन थंडीत गारपीटीमुळे बळीराजा धास्तावला

वर्धा

वर्धा जिल्ह्याच्या काही भागात मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या वर्धा,देवळी,हिंगणघाट,सेलू तालुक्यासह कारंजा तालुक्याच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर मध्यरात्री बरसल्या. मध्यरात्री काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह पाऊस झाल्याने काही वेळ ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता. अचानक आलेल्या या पावसाने चना पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज दुपारी देवळी तालुक्याच्या काही भागात गारपीट झालीय.देवळी तालुक्याच्या रोहणी , विजयगोपाल , मालातपुर , शिरपूर परिसरात गारपीट झालीय.गारपिटीने चणा आणि गहू पिकाचे नुकसान झाले आहे.१५ मिनिटे परिसरात गारांचा पाऊस पडला.अचानक आलेल्या गारांच्या पावसाने वातावरण थंड झाले आहे.

परभणी

परभणी शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तसेच काही भागात गाराही बरसल्या.परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या हवामानशास्त्र विभागाने येत्या काही दिसात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान बुधवारी रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसास सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त असून काही ठिकाणी गाराही बरसल्या आहेत.या अवकाळी पावसामुळे शेतीतील ज्वारी,गहू ,हरबरा हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सांगलीत गारपीट

हिवाळ्यात सांगली आणि मिरज शहरात जोरदार गारांचा पाऊस पडला. विजेच्या कडकडाटा सह जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. अचानक रात्रीच्या वेळी विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. रात्री 1 नंतर पावसाला सुरुवात झाली. पावसा मुळे अनेक भागातील लाईट गेली होती. या पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सांगली व आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली रात्रीच्या सुमारास अचानक पाऊस पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि अन्य पिकांना फटकाही बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये पावसाने जोरदार विजेच्या गडगडाटासह हजेरी लावली. देवरी भागात रात्री अडीज वाजता गारांचा पाऊस पडला. गारांचा पांढरा स्तर पाहण्यास मिळाला असून 7 ते 10 मिनिटे हा गारपीटीचा पाऊस पडला. त्यामुळे त्या भागातील कडधान्य गहू,चना, वाटाणा ,लाखोरी,तूर या पिकांच्या बरोबरीने भाजीपाला यांना सुद्धा मोठा फटका बसला आहे.

सातारा

सातारा जिल्ह्यातील सातारा, माण, कराड तालुक्यात पावसानं हजेरी लावली. कराडमध्ये पहाटेपासून अवकाळी पाऊसाल सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. तर, सातारा जिह्यामधील माण तालुक्यात काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत सर्वत्र ढगाळ हवामान टिकून राहून वा-यासह हलकासा अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे माण तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये काढणीस आलेली रब्बी हंगामातील मका व ज्वारीची ऊंच पिके आडवी झाली. याबरोबरच कमी उंचीची गव्हाचे पिकेही भुईसपाट झाली. परिपक्व कांदा उन्हात वाळू घातलेला कांदा पावसाने भिजू नये यासाठी शेतक-यांची धांदल उडाली.

औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी धामणगाव परिसरात पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह कोसळला पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पडला गारांचा पाऊस झाला.

वाशिम

वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील राजुरा,अमनवाडी परिसरात अवकाळी पाऊस सुरू या पावसामुळे रब्बीतील हरभरा, गहू,पिकासह भाजीपाला पिकाला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळं आधीच अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात कारंजा,मंगरुळपिर ,मालेगाव तालुक्यातील काही गावामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख गावासह परिसरात आज सकाळी दहा नंतर जोरदार पावसासह गारपीट झाली आहे.या पावसामुळे रब्बीतील शेकडो एकरवरील गहू,हरभरा, या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळं शासनाने नुकसान झालेल्या शेतीची पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची रात्री पासून सुरूवात झाली आहे. यामध्ये द्राक्ष बागाचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. काल रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री पासून ढगाळ वातवरण आहे. सकाळी पुन्हा अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली होती.

रत्नागिरी

वेधशाळेनं वर्तवलेला अंदाज खरा ठरवत रत्नागिरी जिल्ह्यात आज पहाटे अवकाळी पावसाची एन्ट्री झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात आज पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. जिल्ह्यातील बहूतांशी भागात मेघगर्जनेसह पाऊस झालाय.मध्यरात्री पावसाला सुरुवात झाली आणि अक्षरश: धो धो पाऊस झालाय. चिपळूण ,संगमेश्वर ,साखरपा , देवरुख या भागात मुसळधार पाऊस झालय ..काही ठिकाणी पहाटे पाऊस झालाय.या अवकाळी पावसामुळं आंबा पिक मात्र अडचणीत आलय आधीच यावर्षी आंबा पिकावर संक्रात ओढवलीय त्यात आंबा उत्पादन खुप कमी झालय आणि आता या पडलेल्या आंबा बागायतदारांचं कंबरडं मोडलय..त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झालाय.

बीड

मध्यरात्रीच्या सुमारास बीड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वडवणी आणि तेलगाव परिसरात गारांचा पाऊस झाला. तेलगाव येथे एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली त्यामुळे झाडाला आग लागली.

यवतमाळ

आज दिवसभार पासून ढगाली वातावरणाचे अवकाळी पावसात रूपांतर झाले असून सकाळच्या बारा वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तत्पुर्वी कालही काही तालुक्यात रात्रीच्या सुमारास तूरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कोरोनाच्या संकटात अवकाळी पावसाची भर घातली आहे.

अवकाळी पाऊस अजूनही अधूनमधून हजेरी लावत आहे. आधीच जिल्ह्यात कोरोना वायरस मुले नागरिक, शेतकरी चिंतेत आहे. अशातच अवकाळी पावसामुळे दमट वातावरणामुळे आबालवृद्ध आजारी पडत आहे.

भंडारा गोंदिया

महाराष्ट्र हवामान विभागाने गारांसह पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तविला असताना भंडारा गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह पावसाने हजेरी लावली आहे. काल दुपारी गोंदिया भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. तर मद्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात विजेच्या कडकडा सह गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पीक लागवड केली असून त्यांच्या पिकात पाणी शिरल्याने पिकांचा मोठं नुकसान झालं आहे.

रायगड:

जिल्ह्यातील महाड तालुक्यात जोरदार गारांचा पाऊस. महाड पोलादपुर रोडवरील काही भागात जोरदार पावसासह गारांचा मोठ्या प्रमाणात वर्षाव झाला.हवामान खात्याने रायगड मध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.


नाशिक

त्रंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस बरसला.अचानक आलेल्या पावसाने काही काळ नागरिकांची ही तारांबळ उडाली.

सिंधुदुर्ग

अवकाळी पावसाने वैभववाडी तालूक्यातील आचिर्णे परीसराला झोडपून काढले. तासभर आचिर्णे परीसरात मुसळधार पाऊस कोसळला असून गाराही पडल्या आहेत. या गारा गोळा करण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिका वर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या:

Weather Alert | परभणीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, काही ठिकाणी गाराही बरसल्या

Pune Weather : पुणेकरांसाठी हवामान खात्याकडून इशारा, ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता

Weather Update : राज्यात पावसाचा कहर, ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऐन थंडीत गारपीटीमुळे बळीराजा धास्तावला

(weather alert of February 18 Central Maharashtra and Marathwada or kokan have been came true of heavy rains by Pune Meteorological department)