मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापूर येथे बोलताना ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट. चोरांचे मंडळ आहे. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे असे विधान केले. संजय राऊत यांच्या विधानाचे जोरदार पडसाद विधानसभेत उमटले. भाजप आमदार आशिष शेलार आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यावर तीव्र भावना व्यक्त केल्या. तर, शिवसेनेचे मुख्य प्रतोद भर गोगावले यांनीही संजय राऊत यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याने सभागृहातील वातावरण तापले. एकीकडे खासदार विधिमंडळाला ‘चोर’ म्हणतात तर दुसरीकडे त्याच सभागृहातील आमदार आक्षेपार्ह शब्द वापरतात. त्यामुळे विधिमंडळात चाललंय तरी काय अशी चर्चा विधान भवनात सुरु आहे.
खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटले. यावरून शिवसेना आणि भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. सभागृहात हा मुद्दा आशिष शेलार यांनी उपस्थित केला. हे कायदेमंडळ आहे. आणि या कायदेमंडळ आहे त्याला कुणी चोर म्हणत असेल तर त्यावर कारवाईचे झाली पाहिजे अशी मागणी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाची एक गनीमा आहे. त्याबद्दल असे कुणी बोलले असेल तर त्यावर निश्चित कारवाई व्हावी. पण, ते काही बोलले असतील तर त्याचे विधान आधी तपासून पहावे आणि नंतर कारवाई करावी अशी भूमिका मांडली. तर, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही विधिमंडळ आदराचे स्थान आहे, त्यांचे म्हणणे तपासून पहा, दोन्ही बाजूने शब्दांचा वापर जपून केला पाहिजे असे म्हटले.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी राऊत यांच्या विधानाबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरत तातडीने हक्क भंग दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.
त्यांच्या विधानाला आमदार रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेतला. जे या सभागृहाचे सदस्य नाहीत त्याचे नाव इथे घेता येत नाही. हक्कभंग सुचना दिली आहे. ती समितीसमोर जाईल. त्यानंतर त्याचा निर्णय लागेल. पण भरत गोगाले यांनी जे विधान केले ते कोणती संसदीय भाषा आहे असा सवाल केला. त्यांचे ते शब्द पटलावरून काढून टाकण्यात यावे अशी मागणी केली.
शिवसेना आमदार यामिनी जाधव यावेळी अधिक आक्रमक झाल्या होत्या. संजय राऊत यांनी याधीही महिला आमदारांना वेश्या म्हटले होते. आता विधीमंडळाचा चोर म्हणत आहेत. त्यामुळे अशी वक्तव्य करणाऱ्यांवर हक्कभंगाची कारवाई व्हायलाच हवी अशा संतप्त भावना व्यक्त केल्या.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्तारूढ बाजूने जोरदार घोषणाबाजी होत होती. जागा सोडून आमदार पुढे आले. त्यामुळे दहा मिनिटे कामकाज तहकूब केले गेले. कामकाज सुरू होताच पुन्हा गदारोळ झाला. त्यामुळे पुन्हा वीस मिनिटासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
पुन्हा कामकाज सुरु होताच आमदार भरत गोगावले यांनी आपले पूर्वीचे विधान मागे घेत असल्याचे सांगितले. पण, संजय राऊत ज्या पद्धतीने बोलत आहेत. आम्हाला चोर म्हणत आहेत. पण तेच ‘महाचोर’ आहेत असे म्हणत राऊत यांची खिल्ली उडविली. यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी अर्ध्या तास आणि पुन्हा पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.