अंबरनाथ : वादाचा पोळा फुटल्याने अंबरनाथमधील बैलगाडा शर्यत (Bullock Cart) पुन्हा चर्चेत आली आहे. वारंवार गोळीबार (Firing) केल्याने चर्चेत राहणारे पंढरीनाथ फडके आहे तरी कोण? ते नेहमी वादात का राहतात, अंगावर जवळपास किलोभर सोने, कमरेला पिस्तूल असे पंढरीनाथ फडके सध्या चर्चेत आहेत. ते एका बैलगाडा शर्यतीच्या संघटनेचे अध्यक्ष ही आहेत. अंबरनाथ बैलगाडा शर्यतीत त्यांच्या किलोभर सोन्या इतकीच ते वारंवार करत असलेल्या गोळीबाराची चर्चा रंगली आहे.
फडके हे गाडीच्या सीटऐवजी नेहमी टपावर बसतात. मैदानात एट्री होताच पैसे उधळतात. बैलगाडीवर ठेका धरतात. तर कधी भर मैदानात हवेत गोळीबार करतात. हेच त्यांच्या वादाचे कनेक्शन ठरले आहे.
बैलगाडा शर्यतीच्या वादात अंबरनाथमध्ये जो गोळीबार झाला, त्यात पंढरीनाथ फडकेसह इतरांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. काही वर्षांपूर्वी क्रिकेटच्या मैदानात त्यांनी केलेला हवेतील गोळीबारही अनेकांच्या चांगलाच आठवणीत आहे.
आधी शेकापशी संबंधित असणारे पंढरीनाथ फडके सध्या भाजपमध्ये आहेत. मात्र बैलगाडा शर्यतीत दादागिरी करुन त्यांच्यावर बैलगाडा शर्यत बंद पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात येतो.
पंढरीनाथ फडकेंना बैलगाडा शर्यतीचा नाद आहे. ते पनवेलच्या विहीघरमध्ये राहतात. त्यांच्या घरात बैलगाडा शर्यतीची पूर्वीपासूनच क्रेझ आहे. राहुल पाटील हे बैलगाडा शर्यतीतले त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
शर्यतीच्या बैलांसाठी ते शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ता अशी जवळपास महिन्याभरात लाखभर रुपयांची खाद पुरवतात. आतापर्यंत 40 ते 45 शर्यतीची बैलं फडकेंनी राखली आहेत.
स्पर्धेऐवजी वारंवार शो ऑफ करुन बैलगाडा शर्यतीला पंढरीनाथ फडके गालबोट लावत असल्याचा आरोप आहे. मात्र काल-परवा बैलगाडा शर्यतीवरुन जो वाद झाला. त्यावरुन राजकारणही तापलं आणि अखेर पंढरीनाथ फडकेंसह इतरांवर गुन्हा दाखल झाला.