भंडारा | 8 जानेवारी 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे खास निकटवर्तीय असलेले आमदार डॉ. परिणय फुके यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये फक्त एकच ओळ लिहिली आहे. क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करतानाचा व्हिडीओ आणि त्यावर एक कॅप्शन एवढंच हे ट्विट आहे. म्हटलं तर हे अत्यंत साधं ट्विट आहे. क्रिकेटशी संबंधित आहे. पण खोलात जाऊन पाहिलं तर या ट्विटला राजकीय आयाम आहे. परिणय फुके हे लोकसभेच्या मैदानात दंड ठोकून उभं असल्याचं सूचित करणारं हे ट्विट आहे. शिवाय फुके हे फडणवीस यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे फडणवीस यांचं पाठबळ असल्याशिवाय ते हे ट्विट करूच शकणार नाहीत हे आलंच. त्यामुळेच तर फुके यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
परिणय फुके यांनी दोन दिवसांपूर्वी हे ट्विट केलं आहे. इस बार धूम मचाएंगे असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याखाली भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सितासावंगी गावात क्रिकेटची मजा लुटतानाचा एक व्हिडीओही पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये फुके हे चौकार आणि षटकार लगावताना दिसत आहेत. त्यांच्या भोवताली कार्यकर्त्यांची गर्दी आहे. पार्श्वभूमीवर ‘जो जिता वही सिकंदर’ या सिनेमातील ‘वो सिकन्दर ही दोस्तों कहलाता है, हारी बाज़ी को जीतना जिसे आता है’ हे गाणं वाजताना दिसत आहे.
या ट्विटचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. क्रिकेटच्या आडून फुके यांना राजकीय संदेश द्यायचा असल्याचंही सांगितलं जात आहे. फुके हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी इस बार धूम मचाएंगे… असं सूचक ट्विट केलं आहे, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे फुके यांच्या ट्विटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
या आधी परिणय फुके यांनी गोंदिया जिल्ह्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. 5 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने गोंदियातील प्रत्येक रस्त्यावर, गल्लोगल्लीत आणि नाक्यानाक्यावर फुके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लागले होते. त्यामुळे फुके यांच्या बॅनर्समुळे संपूर्ण शहर गजबजून गेले होते. वाढदिवसाचं निमित्त साधून फुके यांच्याकडून एकप्रकारे शक्तीप्रदर्शनच केलं गेलं असल्याचं सांगितलं जात आहे.
परिणय फुके हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून लढायचं आहे. या मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे हे विद्यमान खासदार आहेत. तर अजितदादा गट महायुतीत आल्याने या गटाचाही या जागेवर दावा असणार आहे. याच मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांचा पराभव झाला होता. त्यामुळे अजितदादा गटाकडून पटेलांसाठी ही जागा मागून घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दुसरीकडे मेंढे असताना फुके यांनीही लोकसभेसाठी दंड थोपाटल्याने ही जागा कुणाच्या पदरात पडते हे पाहावे लागणार आहे. मागील वेळी सुनिल मेंढे या भाजप खासदाराला विजयी करण्यासाठी फुकेंनी दिवसरात्र मेहनत केली होती. लोकसभेचं तिकिट फुकेंनाच देणार होते, मात्र त्यांनी स्वत: ते नाकारलं होतं. त्यांना विधानसभा हवी होती. त्यामुळे आता पक्ष त्यांना तिकीट देणार की नाकारणार? हे पाहावं लागणार आहे.
येथे पाहा आमदार फुके यांचे ट्वीट –
इस बार धूम मचाएंगे…
📍सितासावंगी, ता. तुमसर, जि. भंडारा.
🗓️ 06-01-2024@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis #BJP #Vidarbha #New #Maharashtra #Politics pic.twitter.com/HULYCiVWLt— Dr Parinay Fuke (@Parinayfuke) January 8, 2024
मागच्या वेळी विधानसभा निडणुकीत साकोली मतदारसंघात नाना पटोलेंविरोधात फुके हरले होते. अगदी थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पटोलेंना पाडण्यासाठी फुके यांना विधानसभेच्या मैदानातही उतरवलं जाऊ शकतं. एक वजनदार नेता पटोले यांच्या विरोधात असावा म्हणून भाजप वेगळी खेळी आखू शकते. पण फुके त्यासाठी तयार असतील का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.