मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्ह दिसतायत. ज्या नेते, आमदारांवर लक्ष आहे, ते फार बोलत नाहीयेत, मात्र काही नेते गेल्या काही दिवसांपासून सूचक संकेत देत आहेत. त्यातच आता द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रातील बातमीने राज्यभरात खळबळ माजवली आहे. अजित पवार एकाएकी पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईत गेले. मुंबईत आपल्या विश्वासू व्यक्तींसोबत त्यांची खलबतं सुरु आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांना घेऊन अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा या वृत्तातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि या बातमीत करण्यात आलेले दावे, वर्तवण्यात आलेल्या शक्यता यांची पडताळणी सुरु आहे. या बातमीत नेमके काय मुद्दे आहेत, ते पाहुयात-
द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रातील बातमीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका विश्वासू सूत्राने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने काही दावे करण्यात आलेत. ते पुढील प्रमाणे-
Big development: Senior NCP leader Ajit Pawar gets consent of his party’s 40 MLAs for his decision to join the hand with BJP. The signatures of these MLAs are also taken as a voluntary consent. @NewIndianXpress #Maharashtra pic.twitter.com/HjQMD6JP17
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) April 18, 2023
या सगळ्या घडामोडींत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं खडखडीत मौन आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्या घेण्यासाठी त्यांना फोन करून बोलावत आहेत, मात्र मोठे पवार यावर काहीही बोलत नाहीयेत. २०१९ मध्ये अजित पवार यांची बंडखोरी दिसून आली तेव्हा शरद पवार यांनी पक्ष अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना बोलावून एकत्र राहण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आजच्या घडीला शरद पवार यांचा अजूनही फोन आलेला नाही, याचं आश्चर्य वाटत असल्याचं राष्ट्रवादीच्या सूत्राने सांगितल्याचा दावा वृत्तातून करण्यात आलाय.
अजित पवार यांनी सोमवारचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले. ते सध्या मुंबईत आहेत. तेथून राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी बोलणं सुरु आहे, असा दावा करण्यात येतोय. तर मुंबईत त्यांच्या विश्वासूंसोबत चर्चा सुरु असल्याचं म्हटलं जातंय.
काल फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी दावा केलाय की, मोदी आणि शहांनी हिरवा कंदील दाखवला, तोच या घडामोडींचा टर्निंग पॉइंट ठरेल. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर किंवा कर्नाटक निवडणुकीपूर्वी हा स्फोट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच अजित पवारांच्या साथीने नवं सरकार स्थापन केलं जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. यासाठी कायदेशीर तर्कही वृत्तातून देण्यात आलाय. अजित पवारांनी निकालापूर्वीच शपथ घेतली तर नवीन सरकार पडणार नाही. किंवा भाजपच्या वर्चस्वाला धक्का पोहोचणार नाही. पडद्यामागे आणि पडद्यासमोर खूप काही घडतंय. आता फक्त अखेरच्या क्षणाची प्रतीक्षा आहे… असं भाजपातील एका सूत्राने सांगितल्याचा दावा या वृत्तातून करण्यात आलाय.