जळगाव : महाराष्ट्रासह देशातील राज्यपाल ( Governor Maharashtra ) आणि उपराज्यपाल यांच्या नियुक्ती संदर्भात राष्ट्रपती भवनाकडून नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsinhg Koshyari ) यांच्या राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करत राज्यपाल पदी रमेश बैस ( Ramesh Bais ) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर महाविकास आघाडीसह विविध नेते प्रतिक्रिया देत असतांना शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. यावर शिंदे गटाचे अर्थात बाळसाहेबांची शिवसेना या पक्षाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, त्यावेळी बोलत असतांना त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मानसिकता राजीनामा देण्याची होती, त्यांची वेळ पण संपलेली होती, लोकांचा रोष ओढून घेण्यापेक्षा त्यांनी राजीनामा दिला असं गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.
त्यांच्याकडून ती चांगले कामे झाली त्याबद्दल त्यांचे आभार पण त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील , पण पुढच्या काळामध्ये असं होऊ नये अशी सावध प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
कोणीही महाराजांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करू नये एवढीच अपेक्षा आहे असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी महापुरुषांच्या बद्दल अवमान होईल असे विधान करू नका असं म्हंटलं आहे.
खरंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुरुवातीपासूनच वादात राहिले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील भूमिका असो वा महापुरुषांच्या बाबतीत केले भाष्य असो महाराष्ट्रात नेहमीच वातावरण तापलेले राहिले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संपूर्ण महाराष्ट्रात राज्यपाल हटाव मोहीम सुरू झाली होती.
त्यानंतर समर्थ रामदास यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारणार असं म्हणत कोश्यारी यांनी नवा वाद उभा केला होता, तर गुजराथी आणि राजस्थानी यांनी मुंबई सोडली तर आर्थिक राजधानी राहणार नाही आणि कोणी विचारणार नाही असं म्हंटलं होतं.
एकूणच राज्यपाल पदावर असतांना सर्वाधिक चर्चेत राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राहिले आहे. त्यातच त्यांनी नंतरच्या काळात पदमुक्त करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली होती, त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे.
भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका करत हल्लाबोल केला आहे. यामध्ये राज्यपाल हटाव मोहीम करण्यात महाविकास आघाडी अग्रस्थानी होती.