लाडकी बहीण योजनेबाबत आणखी काय माहिती? आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट

| Updated on: Dec 27, 2024 | 5:46 PM

लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्यातच आता मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून या योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत आणखी काय माहिती? आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट
Follow us on

लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना सरकारकडून दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पाच हप्ते जमा करण्यात आले आहेत. तर महिलांना डिसेंबरचा हप्ता देखील मिळण्यास आता सुरुवात झाली आहे, दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दर महिन्याला 2100 रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कोणत्या महिन्यापासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान या योजनेवरून विरोधकांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात सरकारची चांगलीच कोंडी केली होती. ही योजना सुरू ठेवण्यासाठी एवढा पैसा कोठून आणणार असा सवाल विरोधक करत होते. तसेच ही योजना सुरू ठेवण्यासाठी इतर योजनांचा पैसा हा या योजनेसाठी वळवला जाईल अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली होती. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘नागपूर बजेटमध्ये निधीची तरतूद केली होती,  24 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे हफ्ते सुरू झाले आहेत, दुसऱ्या विभागाचा कुठलाही निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही, त्या त्या विभागाचे मंत्री निधी पाहात आहेत, त्या त्या विभागाचे मंत्री त्यावर काम करत आहेत, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.

दरम्यान राज्यात महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, यावर देखील यावेळी आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व घटनांचा निषेध आहे,केंद्र सरकारने जे कायदे आणले आहेत, त्याच्यानुसार आता कडक कारवाई होईल, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

शिक्षकांचे पगार रखडल्याची बातमी समोर आली होती, यावर बोलताना त्यांनी म्हटलं की,  शिक्षकांचा पगार होत नाही अशी चुकीची अफवा पसरवली जात आहे. त्यांचेही पगार वेळेत होतील.