ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: Dec 22, 2024 | 8:30 PM

आज छगन भुजबळ यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक पार पडली, या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
Follow us on

नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळातून अनेक अनुभवी नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. यामध्ये छगन भुजबळ यांचं देखील नाव आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. दरम्यान आज या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ? 

आज ओबसी नेत्यांसोबत बैठक झाली, या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी आपली मतं मांडली. त्यांनी असं सांगितलं की या निर्णयामुळे आम्ही त्रस्त आहोत. या निर्णयामागे काहीतरी गौडबंगाल आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान ते पुढे बोलताना असंही म्हणाले की मला भूमिका घ्यायला वेळ लागेल, त्यासाठीच मी या सर्वांशी चर्चा करत आहे. मी ओबीसीसाठी लढणारा नेता आहे, गेल्या 35 वर्षांपासून मी ओबीसीसाठी लढत आहे. याचा अर्थ मी मराठ्यांचा द्वोष करतो असं होत नाही.

दरम्यान वयाच्या कारणामुळे मंत्रिपद नाकारलं का? यावर बोलताना भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाव न घेता हल्लाबोल केला. जर मी वयस्कर झालो असं याचं म्हणणं होतं तर मी आधीच राज्यसभेत जात होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुमची राज्यात जास्त गरज आहे. त्यानंतर मी विधानसभा लढवली, जर वयाचं कारण असतं तर आधीच सांगायचं होतं.  आज जे माझ्या मतदारसंघामध्ये गावागावात जे वातावरण निर्माण झालं ते झालंच नसतं.  आता मी विधानसभेची निवडणूक जिंकलो, तेव्हा तुम्ही सांगता आता राज्यसभेत जा, ते कसं शक्य आहे. असा सवालही यावेळी भुजबळांनी केला आहे. तर दुसरीकडे या बैठकीनंतर बोलताना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे की, भुजबळांकडे मंत्रिपद असो अथवा नसो आम्ही कायम भुजबळांसोबत आहोत.