मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी कार्यक्रम केला. पहाटेच्या त्या शपथविधीची चर्चा अजूनही महाराष्टच्या राजकारणात होत आहे. त्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा भाष्य केल्यानंतर शरद पवार यांनीही ‘ती’ कबुली दिली होती. परंतु, शपथ घेणारे अजित पवार यांनी त्या घटनेवरून बाळगळले मौन आज सोडले. महाराष्ट्रासमोर माझीही बाजू पुढे येणे आवश्यक आहे असे सांगत त्यांनी त्या राजकीय उलथापालथ घडविणाऱ्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला.
2014 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी निकाल लागत असताना आम्ही सगळेजण बसलो होतो. रिझल्ट येत होते. प्रफुलभाई पटेल आणि साहेबांचे काही तरी बोलणे झाले. प्रफुल पटेल बाहेर आले आणि त्यांनी मीडियासमोर आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देतो असे जाहीर केले. वरिष्ठांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला वानखेडेला जायला सांगितले.
आम्ही सगळेजण वानखेडेला गेलो. नरेंद्र मोदी साहेब मला ओळखतात. मी त्यांना ओळखतो. त्यांनी साहेबांची चौकशी केली. शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत दादा पाटील हे भाजपकडून आणि राष्ट्रवादीकडून मी, छगन भुजबळ, जयंत पाटील असे बसले होतो. कुठली खाती मिळणार, पालकमंत्री कोण होणार हे सगळं ठरलं. मी कधी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही, असे दादा म्हणाले.
त्या बैठकीत सर्व ठरलं. आम्हाला निरोप आला. सुनील तटकरे यांना दिल्लीला बोलवलं. दिल्लीला त्यांच्या वरिष्ठांबरोबर मिटिंग झाली. त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं की शिवसेना हा पंचवीस वर्षापासूनच आमचा मित्र पक्ष आहे. आम्ही त्याला सोडणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असे तीन पक्षाचे सरकार राहील. पण, आपल्या वरिष्ठांना ते मंजूर नव्हतं. ते म्हणाले, शिवसेना सोबत चालणार नाही. शिवसेना जातीवादी आहे. हा निरोप घेऊन तटकरे पुन्हा दिल्लीला गेले.
दिल्लीच्या वरिष्ठानी तटकरे यांना आम्ही शिवसेनेला सोडणार नाही असे सांगितले. त्यानंतर शिवसेना – भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. 2019 च्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर परिस्थिती काय होती? त्यावेळी एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते आणि दुसरे वरिष्ठ नेते बसले होते. त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मला आणि देवेंद्रजी यांना कुठे बोलायचं नाही असं सांगितलं.
नेत्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे मी कसा गेलो, कुठे गेलो हे कधीही बोललो नाही. त्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे. अनेकदा मीडियाने विचारलं 2019 ला काय झालं? परंतु, मला कुणाला बदनाम होऊ द्यायचं नव्हतं. त्यावेळेस हे सगळं चालू असताना अचानक बदल झाला आणि सांगितलं की नाही आता आपण शिवसेनेसोबत जायचं.
ज्यांच्यासोबत जायचं नव्हतं त्यांच्याबरोबरच जायचं, असा कोणता चमत्कार झाला की दोन वर्षांनी शिवसेना मित्र पक्ष झाला आणि ज्या भाजपाबरोबर जाणार होतो तो भाजपा जातीयवादी झाला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विचार मतभेद असू शकतात. घरामध्येदेखील घरातल्यांचा विचाराचे अंतर असू शकतं. मत मतांतर असू शकत. मात्र, त्यांनी भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं असे अजित पवार म्हणाले.