विधानसभा निवडणुकींच बिगूल वाजलं आहे, हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना पक्षाकडून इंदापूरमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानं इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी नाराज आहेत, या बंडखोरीचा फटका हा हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्यानं आता हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादी पवार गटाचे नाराज नेते भरत शाह यांची इंदापूरमध्ये येऊन भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच निवडणुकीच्या निकालाबाबत देखील त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
लोकसभेला आपण चांगल्या रीतीने काम केलं. महाराष्ट्र एकेकाळी 1 नंबरचे राज्य होते. आता
1 नंबरचा महाराष्ट्र 6 व्या नंबरवर गेला आहे. राज्यकर्त्यांकडून राज्याकडे दुर्लक्ष झालं आहे.
कापूस, ऊसाबद्दल सरकारचं धोरण शेतकरी विरोधी आहे. देशात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेशमध्ये तयार होणारी साखर देशाची गरज भागून शिल्लक साखर आपण बाहेर पाठवतो.
पण साखर बाहेर पाठवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामुळे साखरेचे दर कमी होतील आणि उसाचे पण दर कमी होतील. केंद्र सरकारकडे आम्ही प्रश्न उपस्थित केला, तेव्हा उत्तर दिलं तुम्ही पिकवणाऱ्याचा विचार करता आम्ही खाणाऱ्यांचा करतो, असं पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, दुष्काळ पडला तेव्हा अमेरिकेकडून गहू मागवावा लागला. आम्ही सत्तेत होतो तेव्हा शेतीमालाच्या किमती वाढून दिल्या. या भागात प्रचंड ऊस आणि केळीचे पीक आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. उद्याच्या निवडणुकीत सत्ताबदल करण्याशिवाय पर्याय नाही. मी अनेक ठिकाणी जातो, राज्यातील लोकांना बदल हवा आहे, असं सूचक विधानही शरद पवार यांनी यावेळी केलं आहे. दरम्यान मोठया मतांनी हर्षवर्धन पाटील यांना विजयी करा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.