मुंबई : राज्य विधिमंडळाच्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये विविध संसदीय आयुधांचा वापर करून आमदार आपल्या मतदारसंघातील समस्यांची गाऱ्हाणी सरकार दरबारी मांडत असतो. अधिवेशन काळानंतर आमदार, त्यांचे पीए मंत्रालयात चकार मारून, हेलपाटे मारून चपला झिजवतात तरी वर्षानुवर्षे त्याचे प्रश्न तसेच अनुत्तरित रहातात. मग, पुढील अधिवेशन तेच प्रश्न आणि मंत्र्याची तीच ती उत्तरे. आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी हिरीरीने पुढाकार घेऊन अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदारांनाच आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर ? या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी निदान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात विधान परिषदेतील अनेक सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील काही प्रश्नांना प्रशासनाने उत्तम प्रकारे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. पण, काही प्रश्नांची उत्तरे अद्याप प्रलंबित आहेत.
शासनाकडून ११४ लक्षवेधी सूचनांची उत्तरे प्रलंबित आहेत. त्याचबरोबर नियम ९३ अन्वये सदस्यानी मांडलेल्या सूचनापैकी ७ निवेदने अद्याप प्रपात झालेली नाहीत. तर, औचित्य आणि विशेष उल्लेख मधील निवेदने शासनाकडून जवळजवळ एक वर्ष उलटूही अदयाप आलेली नाहीत याकडे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी विधानपरिषद सदस्य अतिशय तळमळीने व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्न उपस्थित करत असतात. परंतु प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. त्यावरील उत्तरे लवकरात लवकर पाठवली पाहिजेत.
या विषयात आपण स्वतः लक्ष घालून लवकरच उत्तरे पाठवण्याची सूचना सर्व विभागांना द्याव्यात. काही प्रश्नांची उत्तरे येत नाही. त्यांच्याकडे यादी पाठविली आहे. ते १५ दिवसात यावे. सगळ्या आमदारांना उत्तरे मिळावीत ही अपेक्षा आहे, असे निर्देश दिले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधानपरिषदेतील आमदारांसाठी 21 फेब्रुवारी रोजी विधानभवनात कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
मंगळवारी दुपारी 2.30 ते सांयकाळी 5.30 यावेळेत विधानभवनाच्या पहिल्या मजल्यावरील कक्ष क्र. 118 येथे हे कृतीसत्र होणार आहे. या कृतीसत्रामध्ये विविध संसदीय आयुधे, त्याचा वापर आणि वैशिष्ट्ये, विधयके, अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्या या विषयांवर व्याख्याने होणार आहेत.