भूषण पाटील, कोल्हापूर | महाराष्ट्रात आज पहाटेपासूनच कोल्हापूरमधील घटनांनी खळबळ माजली आहे. ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी कोल्हापूरातील कागल तालुक्यातील आमदार हसन मुश्रीफ (Hasan mushrif) यांच्या घरावर छापेमारी सुरु केली. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ घरी नसताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई सुरु केली आहे. मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई सुरु झाल्यापासून संपूर्ण कोल्हापुरातून मुश्रीफ समर्थक कार्यकर्त्यांची त्यांच्या घराबाहेर गर्दू जमू लागली. ईडीच्या कारवाईला आम्ही घाबरणार नाहीत. असं म्हणत आम्ही सगळे मुश्रीफ यांच्या पाठिशी आहोत, असे म्हणत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. सकाळपासून ईडीच्या अधिकाऱ्यांची कारवाई सुरु आहे. तर बाहेर शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तब्बल ९ तासांपासून हे नाट्य सुरु आहे. पण या गदारोळात हसन मुश्रीफ कुठे आहेत,याचं उत्तर मिळालेलं नाही.
मागील ९ तासांपासून कागल येथील मुश्रीफ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाडा झडती सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कुटुंबियांकडून जबाब नोंदवून घेत आहेत. मात्र हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकत नाहीये. कागलमध्ये एवढा राडा सुरु असताना मुश्रीफ संपर्काबाहेर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते आणि शरद पवार यांचे निष्ठावंत अशी हसन मुश्रीफ यांची ख्याती आहे. तर भाजपविरोधात रोखठोक भूमिका घेणारा, अशीही त्यांची प्रतिमा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात अनेक आरोप केलेत. अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया कंपनीला चालवायला दिला गेला. या दोन कंपन्यांमध्ये २०२० मध्ये करारा झाला होता. हसन मुश्रीफ यांचे जावई या कंपनीचे मालक असल्याने अनुभव नसतानाही हा करार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. तसेच कोलकाता येथील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून १५८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. या संदर्भाने मुश्रीफ यांच्या घरावर ही सलग दुसऱ्यांदा धाड टाकण्यात आली आहे.
आज पहाटेच हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि इतर कुटुंबीय घरात होत्या. घरात हसन मुश्रीफ नसातानाही ईडीच्या अधिकाऱ्यांनी हे धाडसत्र चालवल्यामुळे मुश्रीफ यांच्या पत्नी संतापल्या. यावेळी त्यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. आम्हाला हव्या तर गोळ्या झाडा. काय करायचं ते करा.. अशा शब्दात त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना जुमानणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.