रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतल्या ३७ हजार ५०० कोटी रुपयांच्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी आले होते. भास्कर जाधव म्हणाले, मी पंतप्रधान मोदी यांचे भाषण पूर्णपणे ऐकलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकलं. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा एकचं गाभा होता. मुंबई महापालिकेच्या अकाउंटमध्ये फिक्स डिपॉझिट केलेली रक्कम आहे. ९९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही फिक्स डिपॉझिट आहे. गेल्या २५ वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुंबई महापालिकेनं ही रक्कम ठेवली आहे. त्या रकमेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डोळा दिसतो, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
भाजपच्या ताब्यातील नागपूर महापालिका पूर्णपणे कंगाल झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका भाजपकडं गेल्या पाच वर्षांसाठी दिली. तिथं मोठ्या प्रमाणात लूट झाली. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी जवळजवळ ९०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. तो बाहेर आला.
मुंबईचा विकास करणं हा विषय बाजूला राहिला. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडून मुंबईला काय देणार, याबाबत अवाक्षरही काढलं नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा डोळा हा मुंबई महापालिकेच्या ९९ हजार कोटी रुपयांवर आहे. जी रक्कम फिक्स डिपॉझिट करून ठेवली आहे. त्यावरच भाजपच्या नेत्यांचा डोळा आहे. हे त्यांच्या कार्यक्रमातून आणि कालच्या भाषणातून जाणवत असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली. पंतप्रधान हे देशाचे आहेत. अशा उच्चपदस्थ माणसानं अशी टीका करणं शोभत नाही.
उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याचा कारभार आला तेव्हा देशात कोरोनाचं संकट होतं. त्यावेळी कोणते निर्णय घ्यावे. काय करावं, काय करू नये. हे केंद्र सरकार येथे कळवत होतं. त्यामुळं त्यावेळी फक्त उद्धव ठाकरे हेच घराबाहेर पडले असे नाही. त्यामुळं पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तींन मुंबईवर टीका करणं योग्य आहे, असं मला वाटत नसल्याचंही भास्कर जाधव यांनी सांगितलं.