दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 10 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरकसकट देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याची मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. त्याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करू नये, असं ओबीसी नेत्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी आंदोलनाचा इशाराही ओबीसी नेत्यांनी दिला आहे. तर, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या विरोधकांची पोलखोल करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट कुणाचंही नाव न घेता आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्ही हिरो झालो नाही असं आम्ही मानत नाही. तुम्ही आम्हाला संपवले होते. आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करता. तुम्ही काय चीज आहात हे आम्हाला आता कळले. तुम्ही 5 ते 6 जण काय नमुने आहात हे आम्हाला कळलं. तुम्ही आणि तुमच्या पक्षाने आमचा सतत वापर केला. मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देताय? अजिबात देऊ नका. तुम्ही आता आमचे मराठ्यांचे शत्रू झालात. तुम्ही 5 ते 6 जण आमच्या जीवावर उठला आहात, असं सांगतानाच त्या 6 जणांचे नाव 24 तारखेला मी जाहीर करणार आहे. कोण आमचं वाटोळं करते ते जगाला कळू द्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. पण ते जनतेला मान्य आहे काय? त्यांना गोरगरीब आठवत नाही. तुम्ही कुणासाठी काम करता हे आम्हाला कळलंय. तुमच्या सल्ल्याची गरज नाही. तुम्ही सरड्या सारखे रंग बदलत आहात. तुमच्या सारखा विरोधी पक्ष देशात कुणी नाही. तुम्ही गायकवाड आयोगाला बोगस म्हटलेलं. तुमची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.
आम्हाला तुम्ही सांगू नका काय करायचं. अभ्यास करायचा की नाही? हे तुम्ही सांगायची गरज नाही आमच्या मुलांना, तुम्ही द्वेषी आहात, असं सांगतानाच कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळत असल्याने हे बरळत आहेत. मराठे आता काही दिवसात तुम्हाला सल्ले देतील, असं ते म्हणाले.
गर्व कुणाला झाला आहे लोकांना कळतंय. तुम्हाला तुमच्या जातीविषयी गर्व झाला आहे. असला विरोधी पक्ष नेता असतो का? असले विचार करून तुमचा पक्ष कसा राहील? राहुल गांधींनी हेच शिकवलं का तुम्हाला?या साठी विरोधी पक्ष नेता बनवले का? असा सवाल त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना केला. तसेच आम्ही कसले हिरो? आम्ही चष्मे घालतोय की धोतरावर इन करतोय?, असंही ते म्हणाले.