आंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली आहे. 16 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजता या उपोषणाची सुरुवात होणार आहे. कारण 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. या दिनाचे औचित्यसाधून या मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. मात्र, मनोज जरांगे यांना हिरो करण्यात कोणाचा हात आहे या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
आंतरवाली सराटीत जेव्हा मनोज जरांगे यांच्यासह गावकऱ्यांवर लाठीमार झाला तेव्हा त्यानंतर सुरुवातीला दगडफेक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता. परंतू त्यावेळी राष्ट्रवादीचे दोन आमदार, एक स्थानिक आमदार आणि राजेश टोपे या दोघांनी मनोज जरांगे यांना तिथे परत आणून बसवलं असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यानंतर घटनास्थळावर पवार साहेबांना तिथे भेट दिली. साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. खरी परिस्थिती जी आहे त्याची दोघांना कल्पना नव्हती. पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना इथे पोलिसांवरच मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याचे माहिती नव्हते. अनेक महिला पोलीस कर्मचारी दवाखान्यात दाखल झाले होते असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
काल केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी केंद्र शासनाचा निर्णय चांगला असल्याचे म्हटले आहे आणि त्याचे स्वागतही केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारी आपला कांदा खरेदी करणारे आहेत. आपली निर्यात मोठ्या प्रमाणावर थांबली होती. मोदी साहेबांची जेव्हा नाशिकला जाहीर सभा झाली तेव्हा, मी मीटिंगमध्ये होतो. त्या वेळेला सुद्धा मी त्यांच्याकडे मागणी केली भाजपाकडूनही मागणी झाली. पियुष गोयल यांनी देखील मागणी केली सर्वांनी प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नाला यश आले.निर्यात मूल्य शून्यावर आले आहे, निर्यात शुल्क अर्धे कमी झाले आहे, 20 टक्क्यावर आले आहे. इतर देशातील व्यापाऱ्यांबरोबर आपले व्यापारी स्पर्धेत उतरतील मोठ्या प्रमाणात एक्स्पोर्ट होईल, शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल दोन पैसे अधिक मिळतील असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.