मुंबई : १९ जून १९६६ चा तो दिवस. दादर येथील कदम मेन्शनच्या व्हरांड्यातुन शिवसेनेचा प्रवास सुरु झाला. बाळ ठाकरे नावाचे वादळ घोंघावू लागले. पाहता पाहता तीन वर्ष झाली. संघटना वाढू लागली. शिवसेनेची स्थापना होऊन ३ वर्ष झाली होती. अशातच शिवसेनेत पहिले बंड झाले. हे बंड फक्त पक्षातून बाहेर पडण्याइतके नव्हते. तर, प्रति शिवसेना स्थापन करण्यात आली आणि प्रति शिवसेनाप्रमुख पद निर्माण करण्यात आलं होतं. मुख्य म्हणजे शिवसेनेला ज्या विभागातून सर्वाधिक जनाधार मिळाला होता त्याच कामगारवस्तीतल्या परळ, लालबाग येथे हे बंड झालं होतं.
1969 साली शिवसेनेने पहिली मुंबई महापालिका निवडणूक लढविली. या पहिल्याच दणक्यात शिवसेनेचे ४० नगरसेवक निवडून आले. यात लालबागच्या भाई शिंगरे यांचाही समावेश होता. भाई शिंगरे आणि त्यांचे बंधू बंडू शिंगरे यांचा लालबाग, परळ विभागात मोठा दरारा होता. भाई शिंगरे यांचे लालबागमध्ये फटाक्यांचे मोठे दुकान होते. त्यामुळे परिसरात त्यांच्या नावाचा दबदबा होता. त्यांची इतकी दहशत होती की त्यांना पकडायला यायचे म्हणजे ५० पोलिसांना यावे लागायचे. लग्न १९६५ ला भाई शिंगरे यांचे लग्न मुंबईतील एका मोठ्या चांदी व्यापाऱ्याच्या मुलीसोबत झाले. १९६९ साली त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेमधून लढविली. त्यात विजयी होऊन भाई शिंगरे नगरसेवक झाले.
1970 चे दशक लागले. महागाईने जनता त्रस्त झाली होती. गरिबांचे हाल होत होते. दुकानदार आपल्या दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून बसले होते. त्यामुळे दिवसागणिक जास्त दराने वस्तू जनतेला घ्याव्या लागत होत्या. बाळासाहेबांनी शिवसनिकांना आदेश दिला. त्यानुसार शिवसैनिकांनी चोरबाजार येथील काही कांद्या-बटाट्याची गोदामी फोडली. लुटलेल्या वस्तू स्वस्त दराने मुंबईकरांना वाटल्या. त्यातून जमा झालेल्या पैशांची अफरातफर केल्याचा आरोप बंडू शिंगरे यांच्यावर झाला. बाळासाहेब संतापले, त्यांनी बंडू शिंगरे यांना पक्षाच्या बैठकीतून बाहेर काढले.
झाल्या प्रकारामुळे बंडू शिंगरे यांच्याही रागाचा पारा चढला. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात दंड थोपटले. लालबाग, परळ, काळाचौकी येथील काही सहकाऱ्यांना सोबत त्यांनी प्रति शिवसेनेची घोषणा केली. तर, स्वतःला त्यांनी प्रति शिवसेनाप्रमुख अशी उपाधी लावून घेतली. मात्र, काही दिवसातच बंडू शिंगरे यांचा हा प्रयोग फसला. एकेक करून त्यांचे सहकारी मूळ शिवसेनेत परत आले. पण, बंडू शिंगरे हे बाळासाहेब यांच्याविरोधात लढतच होते.
1977 साली लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव करून जनता पक्ष सत्तेत आला. दादरच्या शिवाजीपार्क मैदानात जनता पक्षाची विजयी सभा झाली. ती झाल्यानंतर बाहेर पडणाऱ्या जमावाने शिवसेना भवनवर दगडफेक केली. यात बंडू शिंगरे यांचा हात असल्याचे बोलले जाते.