कोण आहेत हेमंत पाटील?, खासदारकीचे तिकीट कापलं होतं आता विधानपरिषदेवर

| Updated on: Oct 15, 2024 | 1:15 PM

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हेमंत पाटील सतत आंदोलन करीत असतात. मोठा जनसंपर्क आणि शिवसैनिकांचे पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खासदारकीचा राजीनामा देणारे ते पहिले खासदार होते. परंतु संसदेत समाजाचे प्रश्न मांडा, असे सांगत लोकसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा फेटाळला.

कोण आहेत हेमंत पाटील?, खासदारकीचे तिकीट कापलं होतं आता विधानपरिषदेवर
EX MP HEMANT PATIL
Follow us on

शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार हेमंत पाटील यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. राज्यपाल नियुक्त सात विधान परिषद सदस्यात त्यांची नेमणूक झाली आहे. हिंगोलीचे माजी खासदार असलेल्या हेमंत पाटील यांचे लोकसभेच्या वेळी तिकीट कापण्यात आले होते. त्यानंतर अलिकडेच त्यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यास राज्य मंत्रिपदाचा दर्जा देखील देण्यात आला होता. आता त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करुन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना आता मंत्रिमंडळात स्थान मिळते की नाही याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेनेची सुरुवाती जर ठाणे आणि नंतर मुंबईतून झाली असली तर मराठवाड्यात शिवसेनेने मोठा विस्तार केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारांनी भारावून जाऊन शिवसेनेच्या शाखांचे जाळे मराठवाड्यात वाढले. त्यावेळी सामान्य कार्यकर्त्यांमुध्ये भगवा खांद्यावर घेऊन नांदेडचे हेमंत पाटील देखील सामील झाले होते. हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या विचारांनी भारावलेल्या हेमंत पाटील यांच्यावर शाखा प्रमुख ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. या पदापासून शिवसेनेचा प्रचारास लागलेल्या हेमंत पाटील यांनी मग मागे पाहीले नाही. राजकारणात जिल्हाप्रमुख, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा चढत्या क्रमाने त्यांनी पायऱ्या चढत यश मिळविले. त्यांचा हा प्रवास रंजक आहे.

खासदार म्हणून  निवडून आले

हेमंत पाटील हे २०१९ मध्ये खासदार म्हणून निवडून आले. ते २०१९ ते २०२४ या काळात हिंगोलीचे खासदार होते. त्यांनी शिवसेना फूटीनंतर एकनाथ शिंदे सोबत जाणे पसंद केले. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी हिंगोलीतून खासदारकीची तयारी देखील केली होती. ऐनवेळी तिकीट कापल्याने ते नाराज होते. त्यानंतर त्यांची पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली, परंतू त्यांचा पराभव झाला.

रसवंतीगृह ते कारखाना मालक

एक साध्या रसंवती गृहापासून त्यांनी आपला प्रवास सुरु केला होता. पुढे हेमंत पाटील साखर कारखान्याचे मालक झाले. गोदावरी अर्बन मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जम बसवत त्यांनी जिल्ह्यात मोठी आर्थिक ताकदही उभी केली. ते नांदेड शहरात आषाढी महोत्सवाचे आयोजन करीत असतात. राज्यातील नामवंत कलाकार या सोहळ्याला हजेरी लावतात. नांदेडकरांना सांगीतिक महोत्सवाची मेजवानी मिळत असते.

कौटुंबिक पार्श्वभूमी

हेमंत श्रीराम पाटील यांच्याकडे विज्ञान शाखेची पदवी आहे. त्यांची जन्म तारीख १६ डिसेंबर १९७० अशी आहे.हेमंत पाटील यांच्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांचे वडील श्रीराम पाटील हे पाटबंधारे विभागात अभियंता होते. ते सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या आई कमलबाई गृहिणी आहेत. पत्नी राजश्री पाटील या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गोदावरी अर्बन मल्टीस्टेट पतसंस्थेच्या अध्यक्षा म्हणूनही त्या काम पाहतात. हेमलता राजेंद्र देसले ह्या हेमंत पाटील यांच्या भगिनी आहेत.