इंदिरा गांधी… देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ही त्यांची नातवंडं… आजी नातवाचं नातं विशेष असतं. इंदिरा गांधी या आपल्या नातवंडांसोबत वेळ घालवतानाचे व्हीडिओ आपण पाहिले असतील. पण इंदिरा गांधी यांना कोण अधिक प्रिय होतं? राहुल गांधी की प्रियांका गांधी…? याचं उत्तर या दोघांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून दिलं आहे. त्यांनी आपल्या आजीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आजीला जास्त प्रिय राहुल गांधी होते, असं या व्हीडिओत या दोघांनी सांगितलं आहे.
आमचं बालपण अगदी साधारणपणे गेलं. तेव्हा एवढा सगळा तामझाम नव्हता. सिक्युरिटीचाही इतका काही प्रश्न नव्हता. राजकारण आमच्या जीवनाचा मोठा भाग राहिला आहे. आजी माझ्या बाजूने असायची. ती कायम मला जवळ करायची. पण आमचे वडील प्रियांकाच्या बाजूने असायचे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. त्याला प्रियांका गांधी यांनीही सहमती दर्शवली.
प्रियांका गांधी यांनी त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला आहे. एकदा आजीने काही खेळणी आणली होती. तेव्हा तिने मला बोलावलं. आजी म्हणाली, तुला कोणतं खेळणं हवं ते घे… मी मला माकड आवडलं. ते मी घेतलं. मी खूप आनंदी होते. कारण मला वाटलं की, कोणतं खेळणं हवं, असं आजीने सर्वात आधी मला विचारलं. पण तसं नव्हतं. माझ्या आधीच आजीने राहुलला बोलावून त्याला हवं ते खेळणं दिलं होतं, अशी आठवण प्रियांका यांनी सांगितली.
आमच्या आजीला अटक केली गेली होती. तेव्हा आम्ही पोलिसांशी भांडलो होतो. आमच्या आजीला का घेऊन चालला आहात? असं मी त्यांना विचारलं होतं तुम्ही त्यांना नाही नेऊ शकत असं पोलिसांना आम्ही म्हटलं, असंही राहुल गांधी यांनी या व्हीडिओत सांगितलं आहे.
राहुल गांधी त्यांच्या आणि प्रियांका गांधी यांच्या नात्यावरही बोललेत. त्या दोघांचं नातं कसं आहे? त्यांची भांडणं होतात का? हे देखील राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. आम्हा बहीण भावाचं नातं अगदी वेगळं आहे. आमची नेहमी भांडणं होतात. आजही आमची भांडणं होतात. पण 15 मिनिटांनी आम्ही पुन्हा एकत्र असतो, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.