मुंबई । 17 जुलै 2023 : शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या ‘त्रिशूळ’ सरकारमध्ये नेमकं ‘हायकमांड’ कोण याची चर्चा सुरु होती. आमदार जयकुमार गोरे यांनी एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये ‘हायकमांड’ असल्याचे विधान केले होते. तर, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी त्यांच्या या विधानाला छेद देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच या राज्याचे आणि सरकारचे हायकमांड आहेत असे सांगत पलटवार केला होता. भाजप आणि शिंदे गटाच्या या दावे प्रतिदाव्यात न पडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच थेट मंत्र्यांना झापल्याने ‘हायकमांड; कोण याचीच चर्चा विधिमंडळात होत होती.
राष्ट्रवादीचे अजित पवार सोबत आल्यामुळे आता राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी असे ‘त्रिशूळ’ सरकार स्थापन झाले आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले असून या ‘त्रिशूळ’ सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. अधिवेशनानिमित्त मंत्री आणि सत्ताधारी, विरोधी पक्षाचे आमदार यांचे कार्यकर्ते हजेरी लावत असतात. त्यामुळे विधानपरिसरात एकच गर्दी होत असते.
विरोधकांच्या प्रश्नांना कोणी कसे उत्तर द्यावे यासाठी अधिवेशन काळात दररोज मंत्रिमंडळाची बैठक होत असते. तसेच, सभागृहात अचानक काही परिस्थिती उद्भवल्यास मंत्री, आमदार यांना धावाधाव करावी लागते. नेमक्या अशाचवेळी हे कार्यकर्ते विधानभवनातही येऊन आमदार, मंत्री यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा आग्रह धरतात. शिवाय त्यांच्या या करामतीमुळे विधानभवनाचे नियम पायदळी तुडवले जातात.
विधिमंडळाचे कामकाज सुरु झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सभात्याग केला. विधानसभेत शोकप्रस्ताव झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत अजित पवार यांनी मंत्री आणि आमदार यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. या कार्यकर्त्यांना आवर घाला. प्रत्येक मंत्री यांना दिवसाला केवळ दोनच पास द्यावे. आमदारांनाही तशा सूचना देण्यात याव्यात. मंत्री नसल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची वारंवार वेळ येते.
त्यामुळे प्रत्येक मंत्र्याने प्रश्नोत्तराचे तास, लक्षवेधी सूचना, पुरवणी मागण्या यावेळी सभागृहात हजर रहावे. सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची वेळ आणू नका अशी तंबीच मंत्र्यांना दिली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच अजित दादांनी ही तंबी दिल्याने सारे मंत्रीही अवाक झाले होते. त्यांच्या या सूचनेला मुख्यमंत्री शिंदे यांनीही दुजोरा देत ही सूचना पाळण्याचे मंत्र्यांना आदेश दिले.