आधी मनसे आता ठाकरे गटात… श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढणाऱ्या वैशाली दरेकर कोण?

| Updated on: Apr 03, 2024 | 2:47 PM

उद्धव ठाकरे यांनी अखेर कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या वैशाली दरेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे वैशाली दरेकर यांचा थेट सामना आता शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी होणार आहे. शिवसेनेतून मनसेत आणि मनसेतून पुन्हा शिवसेनेत आलेल्या वैशाली दरेकर यांनी यापूर्वीही लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे.

आधी मनसे आता ठाकरे गटात... श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढणाऱ्या वैशाली दरेकर कोण?
श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढणाऱ्या वैशाली दरेकर कोण ?
Follow us on

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चार मतदारसंघातील उमेदवारी घोषित केली आहे. उद्धव ठाकरे यांनी जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी केली आहे. तर कल्याण-डोंबिवलीतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघरमधून भारती कामडी यांना तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, यातील सर्वाधिक लक्ष वेधलं ते कल्याण डोंबिवलीतील उमेदवारीवरून. उद्धव ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वैशाली दरेकर चर्चेत आल्या आहेत. शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैशाली दरेकर यांचा राजकीय प्रवास रंजक आहे. शिवसेना, मनसे ते पुन्हा ठाकरे गट असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

वैशाली दरेकर या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. पण मनसेच्या स्थापनेनंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यानंतर त्या मनसेच्या तिकीटावर महापालिकेत निवडूनही आल्या. एवढंच नव्हे तर महापालिकेती मनसेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 2009मध्ये त्यांनी मनसेकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्या अचानक चर्चेत आल्या होत्या.

तिसऱ्या नंबरवर

2009मध्ये वैशाली दरेकर यांनी मनसेतून कल्याण- डोंबिवली लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आनंद परांजपे होते. परांजपे यांना 2 लाख 14 हजार 476 मते मिळाली. म्हणजे 39 टक्के मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांना 1 लाख 88 हजार 267 मते मिळाली होती. म्हणजे डावखरे यांना 35 टक्के मते मिळाली होती. तर मनसेच्या उमेदवार असलेल्या वैशाली दरेकर यांना 1 लाख 2 हजार 63 मते मिळाली होती. या निवडणुकीत दरेकर यांचा पराभव झाला. पण पहिल्याच निवडणुकीत लाखभर मते घेतल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. मनसेचीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यानंतर 2016 मध्ये वैशाली दरेकर यांनी पुन्हा शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता.

श्रीकांत शिंदे वेटिंगवर

दरम्यान, ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं तरी शिंदे गटाने श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्याच मुलाची उमेदवारी जाहीर करता आलेली नाही. विशेष म्हणजे ठाणे आणि कल्याण हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. तरीही श्रीकांत शिंदे यांना वेटिंगवर राहावं लागलं आहे.

चुरशीची लढत होणार

वैशाली दरेकर या शिवसेनेच्या फायर ब्रँड महिला नेत्या म्हणून परिचित आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्या श्रीकांत शिंदे यांना मोठी टफ फाइट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ आहे. त्यामुळे वैशाली दरेकर यांचं पारडं मजबूत दिसत आहे. तर, गणपत गायकवाड यांच्या नाराजीचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे. कल्याणमधील भाजप आणि शिंदे गटातील कुरबुरीचा फायदाही वैशाली दरेकर यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या निवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेच्या भूमिकेवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचंही सांगितलं जात आहे.