मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज निर्णय येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी हा निर्णय देणार आहे. या निकालावर केवळ राज्यातील सत्तेचंच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. तसेच शिंदेंसोबत फुटलेल्या आमदारांचंही करिअर पणाला लागलं आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, या निकालापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांनी दावे प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांना आपल्याच बाजूने निर्णय लागणार असल्याचं वाटत आहे. प्रत्येकाने तसा दावाच केला आहे. कुणी कुणी काय दावा केला त्याचाच घेतलेला हा आढावा.
सत्ता आणि सत्य या दोन बाजू आहेत मात्र आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. काहीही झालं तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहणार. सुप्रीम कोर्टाने आमचा व्हिप मान्य केला होता. अध्यक्षांनीही त्यानुषंगाने कायद्याला धरून निर्णय द्यावा. कायद्यानुसार जर पाहिलं तर निकाल आमच्यासोबत असेल, असं ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले.
आजच्या निर्णयावर भाष्य करणं योग्य वाटत नाही. आताचे अध्यक्ष कायद्याचे अभ्यासक आहे. ते योग्य तोच निर्णय घेणार, असं सांगतानाच मी त्यावेळी त्या पदावर होतो. आता मी नाहीये ना. अध्यक्ष अभ्यास करून निर्णय घेतील. अध्यक्ष यांच्यावर जे आरोप केले आहेत ते त्यांचे आहेत. मी त्यावर काही बोलत नाही. जो निर्णय होईल त्याला माझ्या शुभेच्छा आहेत, असं राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ म्हणाले.
निकाल हा आमच्या बाजूने लागेल. संविधानानुसार जर ठरवलं तर जे गद्दारी करून पळाले, ज्यांनी पक्षाचा व्हीप मोडला ते आपात्र होणार असं आमचं ठाम मत आहे. नियमानुसार जर पाहिलं तर एकनाथ शिंदे सोबत गेलेलं 16 आमदार आपात्र होतील. सर्वेोच्च न्यायलाय्याने जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की, त्यावेळी पक्षप्रमुख कोण होता? पक्षाचा अध्यक्ष कोण होता? त्याला निर्णय घेण्याचे अधिकार होते. भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे यांना दिलेली पदे ही बेकायदेशीर होती असं न्यायलाय म्हणतं. सर्वोच्च न्यायलाय्याने दिलेल्या आदेशाची बूज राखायची असेल तर या लोकांना अपात्र केल्याशिवाय अध्यक्षना पर्याय नाही, असं ठाकरे गटाचे नेते अजय चौधरी म्हणाले.
आजच्या निकालाबाबत मला शून्य उत्सुकता आहे. निकालाबाबत वेळकाढूपणा करण्यात आलेला आहे. या निकालापेक्षा आम्ही येणाऱ्या निवडणुकांसाठी काम करत आहोत. उशिरा निकाल देणे सुद्धा अन्यायकारकच आहे, असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
आज निकाल येण्याची अपेक्षा आहे. जो आम्ही उठाव केला त्याला दिलेलं हे एक चॅलेंज आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारा हा उठाव आहे. हा निकाल महाराष्ट्र पुरता सीमित नाही. निश्चितच विजय आमचा होईल.ठाकरे गटाचा स्वभाव आरोप करण्याचा आहे. निवडणूक आयोगावरपण आरोप केले. सुप्रीम कोर्टावरपण आरोप केले आहेत. कोण कुणाला भेटलं हे महत्त्वाचे नाही. कायदा काय म्हणतो याला अर्थ आहे. आपण हरणार आहोत हे त्यांनी मान्य केल आहे. म्हणून कालची ती पीसी घेतली आहे. त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. कोण कोणाला भेटलं तर निर्णय बदलत नसतो. कायद्याच्या चौकटीत आहे तोच निकाल देणार आहे. कोणाच्याही विरोधात निकाल लागला तर सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार हे ठरलेलं आहे. आम्ही देखील हरलो तरी चॅलेज करू. कोणीही हरलं तरी चॅलेंज होणारच आहे, असं ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.