महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. काँग्रेसने त्यांच्या पक्षातीला एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं किंवा शरद पवार गटाने त्यांच्या पक्षातील व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावं. कुणीही उमेदवार जाहीर करा, मी पाठिंबा देईन, असा आग्रहच उद्धव ठाकरे यांनी धरला आहे. त्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री म्हणून कुणाला प्रोजेक्ट केलं जाणार आहे की नाही? याचं उत्तरच पवारांनी दिलं आहे.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची जी भूमिका घेतली आहे. त्यावर भाष्य केलं. मी माझ्या पक्षापुरतं सीमित बोलतो. आमच्याकडून कुणालाही मुख्यमंत्रीपदात इंट्रेस्ट नाही. आम्हाला कुणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला महाराष्ट्रातील सत्तेत परिवर्तन हवं आहे. सत्तेत परिवर्तन करून राज्यातील जनतेला उत्तम शासन द्यावं, हा आमचा प्रयत्न आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
मीही स्पर्धेत नाही
आम्ही कोणीही आमच्या पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असणार नाही. माझा तर प्रश्नच नाही. आता हा मुद्दा काढण्याचीही गरज नाही. लोकांना आज पर्याय हवाय. त्यावर विचार केला पाहिजे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
प्रत्यक्षात घडेल तेव्हा बघू
काही आमदारांनी तुमच्या भेटीगाठी घेतल्या. ते महाविकास आघाडीत येऊ इच्छितात. काय चर्चा झाली? कोणी तुमच्या पक्षात येणार आहे का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काही लोक भेटतात. त्यांनी काही वेगळी भूमिका घेण्याची तयारी केली आहे, पण प्रत्यक्षात घडेल तेव्हा विचार करता येईल. बहुतेक 3 तारखेला मी कागलला जाईल. कागलला एक जाहीर सभा घेण्याचा तिथल्या लोकांचा आग्रह आहे. मी त्याला प्रतिसाद देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
धमकीचं माहीत नाही
यावेळी त्यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरही त्यांनी भाष्य केलं. केंद्र सरकारने तीन लोकांची सेक्युरिटी वाढवली आहे. त्यात माझ्यासहीत आरएसएसच्या प्रमुखाचाही समावेश आहे. त्यांच्याकडे काही माहिती आहे. त्याच्या निष्कर्षावर त्यांनी सुरक्षा वाढवली आहे. मी त्यांना कुणाकडून काही धमकी आलीय का वगैरे विचारलं. पण त्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती नव्हती. ते सांगू शकले नाहीत. होम मिनिस्ट्रीची प्रक्रिया त्यांना माहीत नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं.