पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी आहे. शपथविधीची जय्यत तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणूक निकालामध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. 230 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. महायुतीमध्ये सर्वाधिक 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. मात्र अजूनही महायुतीकडून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये.
समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असाच पॅटर्न राहणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतची आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल असं शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची बातमी समोर येत आहे. गृहमंत्रिपद मिळालं तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार अशी शिंदेंची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. तर दुसरीकडे भाजप देखील गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नाहीये. दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी आता दोन दिवसांवर आला आहे. मात्र शिवसेना शिंदे गटात या सर्व पार्श्वभूमीवर म्हणाव्या तशा हालचालींना वेग आलेला नाहीये.
एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्या मुळगावी दरेगाव इथे गेले होते. त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. दरम्यान आता एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे महायुतीमध्ये नव्या मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे, मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात शांतता असल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटात अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत, मात्र अजूनही गृहमंत्रिपदाचा तिढा न सुटल्यानं त्यांच्याकडून देखील सावध प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रिपद मिळणार का? तसेच शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या वाट्याला कोणते मंत्रिपदं येणार हे पाहाणं महत्त्ववाचं ठरणार आहे.