मुंबई : उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात जिल्हा वार्षिक योजनेचा सर्वाधिक निधी वाटप झाला. त्यामुळे इतर तालुक्यांना निधीचे वाटप असमतोल प्रमाणात झाल्याचा आरोप तुळजापूरचे भाजप आमदार राणा रणजितसिंग पाटील यांनी केला होता. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र पाठवून निधी वाटपात अन्याय झाल्याची तक्रारही केली होती. आमदार राणा पाटील यांच्या या आरोपांची दखल घेत नियोजन विभागाचे प्रधान सचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खुलासा मागितला होता. मात्र, या खुलासामधून आमदार राणा पाटील यांच्या मतदारसंघाला जास्त निधी मिळाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे भाजप आमदारांचा बोलविता धनी कोण याची जोरात चर्चा सुरु झाली आहे.
आमदार राणा पाटील यांनी नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांना पत्र लिहून उस्मानाबाद जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मोठा असमतोल झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली होती. मात्र, हे पत्र पाठवून त्यांनी पालकमंत्री आणि राज्यकार आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या दिशेने संशयाची सुई वळविली होती.
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी नियोजन विभागाचे उपसचिव यांना खुलासा पाठविला असून निधी वाटपामध्ये कोणताही दुजाभाव झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी निधी वाटपासाठी दिलेल्या आदेशाचे सविस्तर पत्रच आकडेवारीसह जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपरिषदेच्या योजनेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 3722.50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये तुळजापूर मतदारसंघासाठी 585.60 लाख रुपये तर भूम, परंडा, वाशी मतदारसंघासाठी 656.46 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा वार्षिक योजनेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 15032.14 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील 30 टक्के निधी म्हणजेच 4509.64 लाख हा पालकमंत्र्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातून प्राप्त झालेले अर्ज, निवेदने, जनता दरबारच्या अनुषंगाने प्राप्त झालेली अर्जे, इतर मंत्री यांच्या शिफारशी, बहिष्कार, आंदोलने, उपोषणे, शिफारशी यासाठी हा निधी राखी ठेवण्यात आला आहे.
आमदार राणा रणजितसिंह पाटील यांच्या तुळजापूर मतदारसंघासाठी 2705.79 लाख रुपये तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या भूम, परंडा, वाशी मतदारसंघासाठी 2555.46 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
तुळजापूर मतदारसंघासाठी जादा निधी मंजूर करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून आरोप केले जात असल्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात समन्यायी पद्धतीने सर्व तालुक्यांना निधीचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये कसलाच दुजाभाव करण्यात आलेला नाही अथवा तफावत नाही. केवळ दिशाभूल करण्याच्या हेतूने आरोप केले जात आहेत अशी प्रतिक्रिया दिली.