महाराष्ट्रातील विधानसभेचे धक्कादायक निकाल लागलेले आहेत. या निवडणूकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेले आहे. भाजपाला १३२ जागा मिळालेल्या आहेत तर महायुतीला २३० जागा मिळालेल्या आहेत. महाविकास आघाडीचे या निकालात अक्षरश:पानीपत झालेले आहे. महाविकास आघाडीला पन्नाशी देखील गाठता आलेली नाही. महाविकास आघाडीला ४६ जागा मिळालेल्या आहेत. या निकालानंतर आज कराड येथे आलेल्या शरद पवार यांनी आपली भूमिका विशद केलेली आहे.
आमच्या अपेक्षे प्रमाणे जागा मिळालेल्या नाहीत. या निवडणूकांत लाडकी बहिण योजनेचा देखील प्रभाव पडला. सत्ताधारी लोकांनी आम्ही सत्तेत आलो नाही तर ही योजना बंद पडेल अशी भीती मतदारांना दाखविली त्याचा ही परिणाम मतदारांवर झालेला असावा, तसेच बटेंगे तो कटेंगेमुळे सारख्या घोषणांनी ध्रुवीकरण देखील झालं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींनी जे भाष्य केलं, त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं हे निश्चित आहे असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. अजितदादांच्या पक्षाला जादा जागा मिळाल्या यावर बोलताना शरद पवार म्हणाले की युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नाही. अजितदादांच्या जागा जास्त आल्या आहेत. हे अमान्य करण्याची गरज नाही. पण राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे, हे महाराष्ट्राला माहीत असावं असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
आमच्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या निवडणूकीत कष्ट खूप केले आहे. त्यात अडचण नाही. प्रमुख नेत्यांनी खूप कष्ट केले तरीही हा निर्णय आला. त्यात लाडकी बहीण, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही प्रवृतीने केला त्याचाही परिणाम झाला असावा. एक चर्चा केली जाते की, समाजातील काही घटकांनी मतदानात वेगळा दृष्टीकोण घेतला असं म्हणतात.ते मला माहीती नाही. आम्ही त्या खोलात जाणार आहोत.ओबीसीच्या मतदानाचा आम्ही अभ्यास करणार आहोत असेही शरद पवार यांनी सांगितले.
ओबीसीच्या मतांचा आम्ही अभ्यास करणार आहोत. ओबीसींचे प्रश्न आहेत. ते मांडू शकतात. आम्ही याचा खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत. देशात महाराष्ट्रात आपण मुख्यमंत्री असताना मंडल आयोग मांडण्यात आला होता. मंडल आयोगाला मंजूरी अनेक राज्यांनी दिली नाही. परंतू आपण प्रथम मंडल आयोगाला मंजूरी दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मंडळ आयोगाचा फायदा ओबीसींना मिळत आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितल.ओबीसीच्या बाबत आमच्या मनात काही वेगळा निर्णय नाही असेही त्यांनी सांगितले.