महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्यानं जुन्या अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे. त्यानंतर भुजबळ चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी अनेकदा आपली नाराजी देखील उघडपणे बोलून दाखवली आहे. दरम्यान त्यातच आता छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
या भेटीवर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी म्हटलं की फडणीस यांच्यासोबत राजकीय आणि सामाजिक विषयावर चर्चा झाली. महायुतीला जे यश मिळालं आहे, त्यामध्ये ओबीसीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान या भेटीमध्ये फडणवीस यांनी भुजबळ यांना वेट वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याचं समजतंय. 10 दिवसांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळ यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
या भेटीवर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत, मंत्री म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिले, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी या ठिकाणी काम केलं आहे. एक ओबीसी समाजासाठी काम करणारा नेता अशा प्रकारची त्यांची प्रतिमा महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आहे.
मंत्रिमंडळात त्यांचा समावेश न झाल्याने स्वभाविक त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते नाराज होते. मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून त्यांनी ही भेट घेतली असू शकते. देवेंद्रजींचा जर एकंदर स्वभाव आपण पाहिला तर सगळ्यांशी समन्वय साधत सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती आहे. हीच त्यांच्या कामाची पद्धत आहे. भुजबळ साहेबांसारखा नेता नाराज असणं हे त्या ठिकाणी योग्य वाटत नाही. देवेंद्र फडणीस हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ही भेट झाली असावी असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.