काल मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला, नागपुरात नव्या मंत्र्यांच्या शपथग्रहन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू झालं आहे. छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे रामदास आठवले देखील नाराज आहेत. त्यांनी देखील दोन मंत्रिपदाची मागणी केली होती.
दरम्यान या सर्व घडामोडीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रामदास आठवले यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत न पोहोचल्यानं त्यांनी आठवले यांची माफी देखील मागितली आहे. ‘मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडून चूक झाली आहे’ असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आठवले?
‘मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडून चूक झाली आहे’ असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्यांना संधी मिळाली नाही, असे महायुतीचे काही नेते नाराज आहेत त्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, कोणाला नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमध्ये चांगलं स्थान मिळेल. सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रिपदावरुन कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या पक्षातील नाराजांची नक्कीच समजुत काढतील. घराणेशाहीचा आरोप योग्य नाही. ज्यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे हे त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले आहे. घराणेशाही मुळे मिळालेले नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
भुजबळ नाराज
दरम्यान रविवारी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना स्थान मिळू शकलेलं नाहीये, यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला काढलं काय फेकलं काय? असे किती तरी मंत्रिपद आले आणि गेले मला मंत्रिपद महत्त्वाचं नाही तर मान सन्मान महत्त्वाचा असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.