रेल्वेने अलिकडे वेटिंगच्या तिकीटावर ट्रेनमधून प्रवास केल्यास प्रवाशांवर दंड आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच त्याला पुढील स्थानकावर उतरविले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासन जादा वेटिंगचे तिकीट मूळात देत का? असा सवाल रेल्वे प्रवाशांनी केला आहे. तिकीट कन्फर्म होतील इतपतच वेटिंगची तिकीटे विकली तर रेल्वेवर अशी कारवाई करण्याची वेळ येणारच नाही असे रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे. मध्य रेल्वेने गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांसाठी काल-परवाच 202 स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे. कोकणात जाणाऱ्या नियमित रेल्वे गाड्यांची गणेश चतुर्थी सणाच्या आदल्या दोन दिवसांची तिकीटे बुकींग सुरु होताच संपली आहेत. तसेच रेल्वेने या भलीमोठी वेटिंग लीस्ट जारी केली आहे. या तिकीटावर जर चाकरमान्यांनी प्रवास केला तर त्यांनाही हाच न्याय रेल्वे लावणार काय असा सवाल प्रवासी संघटनांन केला आहे.
भारतीय रेल्वेने नवा नियम काढला आहे. जर तुमच्याकडे वेटिंगचे तिकीट असले तर तुम्ही आरक्षित डब्यांमधून प्रवास करु शकणार नाही. मग भलेही तुम्ही बुकींग विंडोमधून तिकीट विकत घेतलेले असले तरीही तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते असे रेल्वेचे म्हणणे आहे. जर अशा प्रकारे रेल्वेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे तर तो आरक्षित प्रवाशांच्या दृष्टीने चांगला निर्णय आहे. परंतू मग रेल्वे जादा वेटिंगची तिकीटे का जारी करते ? असा सवाल डोंबिवलीचे रहिवासी बळीराम राणे यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की रेल्वे मंत्रालयाने वेटींगच्या तिकिटावर प्रवास करणे हा गुन्हा ठरविला आहे. त्यामुळे अशा तिकिटावर प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात झाली आहे. एका दृष्टीने योग्यच आहे. परंतू मुळात जेवढी वेटींग तिकिटे कन्फर्म होतील त्याच पटीत वेटींगची तिकिटे दिली गेली तर ही वेळ येणारच नाही असे प्रवासी बळीराम राणे यांनी म्हटले आहे.
कोकण रेल्वेच्या मांडवी एकस्प्रेसला D-1 ते D-4 अशा चार डब्यांमधून ( चेअर कार ) दिवसाबसून प्रवास करण्याची सुविधा होती ..परंतू कोविड मध्ये ती बंद केली. कोविड मध्ये ज्या सेवा बंद केल्या होत्या त्यातील बऱ्याचशा सुरू झाल्या पण मांडवी एक्स्प्रेस ची दिवसा बसून प्रवास करण्याची सेवा अजून सुरू झालेली नाही.
कोकण रेल्वे तर गणपती आगाऊ आरक्षणात 1100 पर्यंत वेटींगची तिकिटे वितरीत करते. मग अशा प्रवाशांनी करायचे काय ? वेटींगचे प्रवासी म्हणजे धोबी का कुत्ता घर का ना घाट का अशी अवस्था आहे. एकीकडे रेल्वे तिकिटे वितरीत करते तेव्हा आरक्षण चार्जेस, जीएसटी, सुपर फास्ट चार्जेसच्या नावाखाली प्रवाशांकडून जादा पैसा घेत असते.
उदाहरणार्थ कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे देता येईल. ट्रेन क्रमांक 110003 तुतारी एक्स्प्रेस स्लीपर क्लास तिकिटावर 20 रूपये आरक्षण शुल्क आहे तर 3 AC आरक्षण शुल्क 40 रुपये आणि GST 43 रूपये असे एकूण 83 रूपये वसुल केले जातात. तसेच 20111 कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये स्लीपर क्लास आरक्षण शुल्क 20 रूपये, सुपरफास्ट चार्जेस 30 रूपये असे एकूण 50 रूपये तर 3 AC आरक्षण शुल्क म्हणून 40 रूपये आणि 45 रुपायांचा सुपरफास्ट चार्जेस आणि 45 रुपयांचा GST असे एकूण 130 रुपये आकारले जातात.
वेटींग तिकीट रद्द केले तर स्लीपर क्लासला 60 रूपये तर 3 AC चे तिकीट रद्द केले तर 180 रूपये कापले जातात मग अशावेळी आधी आकारलेले आरक्षण शुल्क तसेच सुपरफास्ट शुल्क का परत का केले जात नाही ? जर प्रवाशांनी प्रवासच केलेला नाही तर सुपरफास्ट चार्जेस परत करायला हवा असे बळीराम राणे यांनी म्हटले आहे. याच मुद्यावर 25 जुलै 2013 रोजी माहितीच्या अधिकारात कोकण रेल्वे प्रशासनाला प्रश्न विचारला होता की जास्तीत जास्त वेटींगची किती तिकिटे वितरीत केली जाऊ शकतात ? त्यावर कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असे उत्तर दिले होते.
कोकण रेल्वेच्या मांडवी एक्सप्रेस ला D-1 ते D-4 असे चार डब्यांमधून दिवसा बसून प्रवास करण्याची ( चेअर कारचे डबे ) होती. परंतू कोविडमध्ये ही सेवा रेल्वे प्रशासनाने बंद केली. कोविडमध्ये ज्या सेवा बंद केल्या होत्या त्यातील बऱ्याचशा सुरू झाल्या, पण मांडवी एक्सप्रेसची दिवसा बसून प्रवास करण्याची सेवा अजूनही सुरू झालेली नाही याकडेही बळीराम राणे यांनी लक्ष वेधले आहे.