मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरु आहेत. यावर शिवसेना ( शिंदे गटाचे ) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असताना नाराज होते. त्यांचा मोबाईल रिचेबल नसणे ही काही मोठी गोष्ट नाही. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार निवडणुकीत जेव्हा पराभूत झाला तेव्हापासूनच ते नाराज होते. सकाळचा शपथविधी ते आता झालेला महायुतीचा मेळावा यात अजित पवार यांच्यासारख्या नेत्याला डावलले गेले त्यामुळे या नाराजीत आणखीनच भर पडली असे संजय शिरसाट म्हणाले.
अजित पवार यांची नाराजी आणि आमची सुप्रीम कोर्टात सुरु असलेली केस याचा काहीही संबंध नाही. महाविकास आघाडी ही काही काळापुरती होती. राज्यात सत्ता आणण्यासाठी होती. आता ती आघाडी सत्तेत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष वेगवेगळ्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आपसातील बेबनाव आता पुढे येत आहे. आघाडीत बिघाडी होण्यास सुरवात झाली आहे असे शिरसाट म्हणाले.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांचे स्वागत करू. पण, राष्ट्रवादी भाजपसोबत येईल हा कयास चुकीचा असल्याचे ते म्हणाले. आघाडीपासून ते स्वतंत्र झाल्यास आम्ही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करु. पण, राष्ट्रवादी भाजपसोबत आल्यास आम्ही सत्तेत राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
अजित पवार हा टायमिंग साधणारा, शिस्त पाळणारा नेता आहे. महायुतीचे मेळावे चाले आहेत त्यात त्यांचे स्थान कुठे आहे हे शोधावे लागेल. संभाजीनगर, नागपूरला मेळावे झाले. नागपूरच्या सभेत ते चार तास बसले आणि परत गेले. दहा मिनिटे त्यांना बोलू दिले असते तर काय झाले असते?
१४ ते १५ आमदार असलेल्या नेत्याचे प्रमुख भाषण होते आणि ५४ आमदार असलेला नेता एका बाजूला हा अजित पवार यांचा अपमान आहे. काँग्रेसमध्येही अशीच चलबिचल सुरु आहे. ४५ आमदारांचा पक्ष आहे त्याचे नेतृत्व १५ आमदारांच्या पक्षाने करावे हे काँग्रेसच्या आमदारांनाही मान्य नाही. त्यांचीही आकड्यांची जुळवाजुळव सुरु आहे. ते जमले काँग्रेसचे आमदारही आमच्यासोबत येतील असा दावा त्यांनी केला.
सकाळचा शपथविधी प्रकाराबाबत अजित पवार यांनी कधीही भाष्य केले नाही. मात्र, हे प्रकरण त्यांच्यावर शेकले गेले. त्यानंतर शरद पवार यांनीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नये म्हणून घेतलेला तो निर्णय होता असे सांगितले. त्यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिले नाही, यावरून त्यांना मोहरा बनवले गळे हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.
मंत्री धंनजय मुंडे एकदा अजित पवार यांना म्हणाले, मी मुख्यमंत्री साहेबांना माझ्या खात्याचे काही काम आहे म्हणून अनेक वेळा फोन केले. पण त्यांनी फोन घेतला नाही. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘अरे, तू कोण आहेस रे ? मंत्री आहेस. मी उपमुख्यमंत्री आहे. तरी माझेही फोन घेत नाही. हा किस्सा मुंडे यांनीच आपल्याला सांगितला असे शिरसाट म्हणाले