अकोला : 7 सप्टेंबर 2023 | सोलापूर जिल्ह्यात सोलापूर आणि माढा असे दोन लोकसभा मतदारसंघ येतात. 2019 च्या निवडणुकीत येथून सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी अशी तिरंगी लढत येथे झाली होती. या निवडणुकीत भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी विजयी झाले होते. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे.
काँग्रेसची जनसंवाद यात्रा अकोला जिल्ह्यात पोहोचली आहे. या यात्रेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सहभागी झाले. आमदार प्रणिती शिंदे याही या यात्रेला उपस्थित होत्या. त्यावेळी वडेट्टीवार यांनी हे विधान केले आहे. सध्या सनातनांचा विषय गाजत आहे. खरं तर सनातनांचा हा विषय तामिळनाडूमध्ये काढला गेला. महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी तो विषय काढला नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
देशामध्ये किंवा राज्यामध्ये तेढ निर्माण होईल अशी कुणाची भावना असेल तर ती देशाला परवडणारी नाही, देशाच्या पंतप्रधानाला माहित आहे की नऊ वर्ष आपण काही केलं नाही. केवळ फक्त धर्माध, जातीय विष पेरल्याने यश मिळतं. हे भारतीय जनता पक्षाला माहिती आहे. म्हणूनच पंतप्रधान असे वक्तव्य करतात, अशी टीका त्यांनी केली.
मुंबईमध्ये महापलिका निवडणुका लावण्यासाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे नियोजन केले जात आहे. ही भाजपची स्टंटबाजी आहे. मुंबईची तिजोरी भाजपने खाली केली. FD मोडल्या. आमदार, खासदार यांना लाखो करोडो रुपये दिले. नगरसेवक माजी झाले तरी त्यांना वीस, पंचवीस कोटी रुपये दिले. या पैशाची उधळपट्टी केली असा आरोप त्यांनी केला.
महापालिकेत इतकी वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी तिजोरी वाढविण्याचे काम केले. पण, ती भरलेली तिजोरी खाली करण्याचे पाप भाजपने केले. आता हे सगळं देऊन त्याच पैशातून कमिशन खाऊन दहीहंडी साजरी केली जात आहे, असी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
आमदार प्रणिती शिंदे बदला घेणार?
प्रणिती शिंदे या कणखर, लढाऊ नेत्या आहेत. तशाच त्या सोज्वळ आणि शांत आहेत. सातत्याने काम करत राहणं, लोकांची काम करत राहणं हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता राहिलेला आहे, त्यामुळेच गेले तीन टर्म त्यांना आमदार म्हणून लोक निवडून देत आहेत, हे त्यांचे प्रतीक आहे, त्यामुळे लोकसभेचं प्रतिनिधित्व त्यांनी करावं अशी लोकांची भावना आहे. आमदार प्रणिती शिंदे वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.