शिर्डी : शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबिर पार पडतंय. पुढच्या वर्षी विठ्ठलाची महापूजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील, असं ट्वीट राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलंय. अमोल मिटकरी म्हणाले, सध्याच्या सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आक्रोश आहे. पंढरपुरात आषाढी आणि कार्तिकीची महापूजा ही मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडते. परंतु, पुढच्या वर्षी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ही महापूजा करेल. देवेंद्र फडणवीस यांनी आजही महापूजा ही उपमुख्यमंत्री म्हणून करावी लागली. परंतु, पुढची महापूजा फडणवीस मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून करू शकणार नाही, असा माझा ठाम विश्वास असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा राज्यातला प्रादेशिक पक्ष आहे. १०० आमदार निवडून आणू. कारण आम्ही भविष्याचा वेध घेत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री आगामी काळात नेतृत्व करताना दिसतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
हे सरकार घटनाबाह्य आहे. नियमावली पाळत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याचं उल्लंघन कुणी करत असेल, तर ठीक आहे. गुलाबराव पाटील हे जास्त प्रक्षोभक बोलतात. त्या तुलनेत शरद कोळी हे तेवढे प्रक्षोभक बोलले नाहीत. तरीही त्यांच्यावर जिल्हाबंदी आणली.
आमदार रवी राणा यांनी कोथळा काढण्याची भाषा केली. त्यांच्यावर का नाही केली अमरावतीत जिल्हाबंदी. तुम्ही घाबरलेले आहात. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रांना शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेलं आहे. जिल्हाबंदी करून कुणाचा आवाज दाबता येणार नाही. उलट जास्त उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिली.
जिल्हाबंदी वाढविल्यास जनतेचा रोष हा मतपेटीतून दिसेल.गुलाबराव पाटील यांनी असं केलं. याचं कारण गुलाबराव पाटील हे मनातून घाबरले आहेत, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला.