अंतरावली सराटी, जालना | 29 ऑक्टोंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा इशारा दिलाय. तर, देवेंद्र फडणवीस यांना चर्चेला यायचं असेल तर त्यांना अडवलं कुणी असा थेट सवाल केलाय. मला बोलता येत आहे तोपर्यंत या. फक्त एकदा या. माझे मराठे तुम्हाला अडवणार नाही. त्यांना रस्ता देऊ. मला बोलता येतं तोपर्यंत या. पण, माझी बोलती बंद झाली आणि तुम्ही नाटक म्हणून आले तर मराठे तुम्हाला बेजार करतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखती दरम्यान जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला जाण्यास हरकत नाही असे विधान केले होते. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी तुम्हाला अडवलं कुणी असा प्रती सवाल केला. चर्चेला येऊ देत नाही म्हणतात. म्हणून म्हणतो या. मला बोलता येतंय हे तितकंच खरं आहे. तुम्ही आज या, उद्या या. आज उद्या मला शंभर टक्के चांगलं बोलता येऊ शकतं हे माझं शरीर मला सांगतंय असे ते म्हणाले.
शिंदे समितीचा आणि आमचा काही संबंध नाही. त्यांना एक पुरावा सापडला तरी आरक्षण देता येतं. यापुढे मराठ्यांना वेड्यात काढू नये. तुम्ही समितीला ५० वर्षाची मुदत दिली तरी आम्ही ऐकणार नाही. आम्ही आंदोलनाची किती टप्पे पडले ते आम्हाला माहित आहे. एक एक टप्प्यात काय करणार हे आम्हाला माहित आहे. शेवटी सरकारला कुणाच्या तरी हातात जीआर द्यावाच लागणार आहे. अशी परिस्थिती येईल की सरकारला इकडे येताच येणार नाही. कुणाकडे तरी जीआर द्यावा लागेल. मगच ते आंदोलन थांबेल. आमचे टप्पे आम्हाला माहित आहे. आमच्या पद्धतीने आंदोलन करणार आहे. ते सुरुच आहे. यायचं असेल तर या नाही तर नका येऊ असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
आता हळूहळू देशातील क्षत्रिय मराठा उठणार आहे. हे थोड्या दिवसात कळेल. थोडं थांबा, असा खणखणीत इशारा त्यांनी सरकारला दिला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात २५ ते २८ असे चार दिवसाचं साखळी उपोषण केलं. नंतर २९ ते १ आमरण उपोषण हा दुसरा टप्पा सुरू आहे. सगळं शांततेत सुरू आहे. उपोषणही शांततेत करा. आरक्षण मिळणारच. प्रत्येक टप्प्यात चार विषय आहे. त्यातील दोन विषय सुरू राहील. आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण करा असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं.