काँग्रेसला भाजपच्या उपरण्याची ‘हात’घाई, काय म्हणाले नेमकं प्रदेशाध्यक्ष

| Updated on: Jul 13, 2023 | 6:54 PM

भाजपची ताकद वाढवणे हे आमचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यासाठी सर्वांशी समनव्य साधने महत्वाचे आहे. मोदी सरकार आणि राज्यातील युती सरकारच्या योजना 1 लाख बुथपर्यंत पोहचवणे हे लक्ष्य आहे. आमची विकासकामे लोकांपर्यंत पोहचवणार आहे.

काँग्रेसला भाजपच्या उपरण्याची हातघाई, काय म्हणाले नेमकं प्रदेशाध्यक्ष
NANA PATOLE AND CHANDRASHEKHAR BAVANKULE
Follow us on

भिवंडी : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. अजित पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून बाहेर पडले. राज्यातील या दोन मोठ्या पक्षांना फोडल्याचा आरोप भाजपवर होत आहे. त्यातच आता काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या एकमागोमाग येऊन धडकत आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे सर्वच विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश व्हावे यासाठी योजना केल्या आहेत. 288 पूर्ण वेळ विस्तारक यासाठी काम करणार आहे असे बावनकुळे म्हणाले आहेत.

भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची समनव्य समिती गठीत झाली आहे. तिन्ही पक्षातून 4 सदस्य अशी एकूण 12 सदस्यांची ही समिती आहे. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहिला पाहिजे म्हणून समिती तयार केली आहे. महाविकास आघाडी किती कमी करता येईल हा आमचा प्लॅन आहे, अशी कबुलीही बावनकुळे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

आमच्या महायुतीच्या आमदारांची संख्या 206 इतकी गेली आहे. त्यामुळे आपले आमदार अस्वस्थ होतील, ते बाहेर पडतील अशी भीती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना वाटत आहे. त्यामुळे आपल्या आमदारांना दरी देण्यासाठी ते काही बोलत असतात. पण, काँग्रेसमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे, असा दावा त्यांनी केला.

आपले सरकार परत येणार नाही यामुळे त्यांच्यातील एक ग्रुप अस्वस्थ आहे. भविष्यात ते वेगळा निर्णय घेतील अशी भीती नाना पटोले यांना आहे त्यामुळे ते असे बोलत आहेत. मविआमध्ये जे काही जण आता उरले आहेत त्यांना आमच्याकडे यायचे असेल. काँग्रेसमधून जे कोणी येणार असतील त्यांचे स्वागत आहे. त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे उपरणं रेडी आहे, असे बावनकुळे म्हणाले.

पंकजा मुंडे गैरहजर

भिवंडी येथे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे या गैरहजर होत्या. मी पंकजा मुंडे आणि प्रीतमताई मुंडे यांच्याशी बोललो आहे. त्यांच्या छोट्या बहीणीच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्या येऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले. आम्ही तिन्ही पक्ष मिळून आमचे टार्गेट आम्ही अचिव्ह करू. विधानसभेच्या ८० ते ८५ टक्के जागा जिंकू शकतो त्याच आम्ही लढवणार आहोत असेही त्यांनी सांगितले.