प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. कंगना ही हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. भाजपने तिला तिकीट दिलं आहे. कंगनाने जोरदार प्रचारही सुरू केला असून या प्रचारा दरम्यान बिनधास्त विधानेही करत आहे. त्यामुळे कंगना वाद ओढून घेतानाही दिसत आहे. पण कंगना खरोखरच निवडून येणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर कंगनाला संसदेपर्यंत जाता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे, असं भाकीतच वर्तवलं आहे. त्यामुळे कंगनाच्या विजयाबाबतच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना कंगना निवडून येणार नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी राऊत यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांची आजा पालघरच्या बोईसरमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेला महाविकासा आघाडीचे नेते आणि डाव्या पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. पालघरमध्ये महायुतीने उमदेवार दिला नाही. हा उमेदवार कोण येतो याबाबत साशंकता आहे. गावित जरी शिवसेनेत असले तरी त्यांना कमळावर लढण्याची इच्छा आहे अशी परिस्थिती आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये गोंधळाचे चित्र आहे. दिल्लीतील भाजपचे लोक यांचे उमेदवार जाहीर करतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
निवडणूक आयोग दखल घ्या
कोल्हापूर हातकणंगले आणि कोकणात भाजप आणि मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धमकी सत्र सुरू केलं आहे. अमिषं दाखवली जात आहेत. याची दखल महाराष्ट्र निवडणूक आयोगाने घ्यायला हवी. एका बाजूला विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कठोरपणे लावता आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाची लोक सरपंचांना धमक्या देत आहेत. मतदारांना अमिष देत आहेत हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मंडलिक वारसदार आहेत काय?
संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या गादीचा अपमान केला. त्यामुळे कोल्हापुरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीचे वारसदार नाहीत तर मग मंडलिक वारसदार आहेत काय? कोल्हापूरच्या गादीबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या पद्धतीने चिखलफेक केली जात आहे ते निषेधार्ह आहे. शाहू महाराज आधीपासूनच सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. राजकीय स्वार्थासाठी मंडलिक यांनी अशी भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे.
उत्तर मुंबईची जागा मिळाली तर
जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. वर्षा गायकवाड नाराज नाहीत. महायुतीच्या सहापैकी एकही जागा मुंबईत निवडून येणार नाही. आमचं चॅलेंज आहे. उत्तर मुंबईची जागा जर शिवसेनेला मिळाली तर तीही जागा आम्ही निवडून आणू, असं त्यांनी स्पष्ट केलं.